अजित पवारांना मी सल्ला देऊ इच्छितो की इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना आपण गांभीर्याने वक्तव्य केले पाहिजे. भाषेचे भान बाळगून प्रतिक्रिया दिल्या पाहिजे, अशा कानपिचक्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देतानाच त्यांच्याबाबतचा निर्णय आमदार नाही; पक्ष घेईल, असे केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.  शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी झालेल्या चूकीबद्दल वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहात माफी मागितली आहे. आता या मुद्द्यावरुन विधानसभेचे कामकाज रोखून धरणे योग्य नाही.
पूर्वीच्या काळी सभागृहात एका मुख्यमंत्र्याने असेच एक बेताल वक्तव्य केले होते. त्याचे उदाहरण देऊन शरद पवार यांनी अजित पवारांच्या माफीनंतर हा विषय संपल्याचे स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ठाणे, दिवा, मुंब्रा या परिसरातील एकूण ७० टक्के बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती मला मिळालीये. ही जर वस्तुस्थिती असेल, तर ही बांधकामे पाडणे योग्य आहे का? बेकायदा बांधकामे कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरुवातीला सभागृहातील सदस्यांची बांधकामे अनधिकृत असतील, तर ती आधी पाडा.  त्यात अगदी जितेंद्र आव्हाडांची बांधकामे  असतील , तरी ती  आधी पाडा. यामुळे लोकांमध्ये अनधिकृत बांधकामांबद्दल योग्य संदेश जाईल.  एखादा माणूस ५० वर्षांपासून एखाद्या ठिकाणी राहात असेल आणि जर त्याला आज कळाले की ते बांधकाम अनधिकृत आहे, तर ते पाडणे कितपत योग्य आहे. सामन्य नागरिकांचाही विचार करायला हवा. 
राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची पाहणी करावी. जर मोठा दंड आकारून बांधकामे कायम करणे शक्य असेल, तर त्याचा जरूर विचार करावा, असाही सल्ला त्यांनी दिला.

Story img Loader