लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वडाळ्यात वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी टॉवर कोसळल्याच्या घटनेची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, त्याची कारणे काय आणि पार्किंग टॉवरच्या रचनेत काही संरचात्मक त्रुटी होत्या का याचा तपास करण्यात येणार आहे. यासाठी ‘झोपु’ प्राधिकरणाने सल्लागाराची नियुक्तीही केली असून या सल्लागाराचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मुंबईत सोमवारी पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे वडाळ्यातील बरकत अली रोडवरील एका झोपु योजनेतील वाहनतळासाठी उभारण्यात येत असलेला लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले. या दुर्घटनेची झोपु प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी विकासकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी नुकतीच संबंधित विकासकावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांत या नोटीसला समाधानकारक उत्तर देणे विकासकाला बंधनकारक आहे. विकासकाचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसरीकडे ही घटना नेमकी कशी घडली आणि वाहनतळाचा सांगाडा मजबूत होता का, त्याचा पाया मजबूत होता का, आरेखन योग्य होते का, वापरण्यात आलेले साहित्य चांगल्या दर्जाचे होते का, अशा अनेक बाबींचा तपास करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आणखी वाचा-मुंबई : पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू

प्रकल्पस्थळ व वाहनतळाच्या सांगाड्याच्या पायाची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पॅनलवरील शशांक मेहंदळे अॅण्ड असोसिएट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. या कंपनीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्याचा आयआयटी, व्हीजेटीआय वा अन्य संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येणार आहे. तर नियुक्त संस्थेकडून अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘कारणे दाखवा’ नोटिसा

वडाळा दुर्घटनेची गंभीर दखल घेत झोपु प्राधिकरणाने विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विकासकावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर विकासकाबरोबरच त्याचे तीन भागीदार, वास्तुशास्त्रज्ञ, प्रकल्पातील अभिंयते यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीसा देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to investigate the incident of the collapse of an iron tower erected for a parking lot in wadala mumbai print news mrj