मुंबई : मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती संदर्भात निर्णय घेण्यासाठी आता मुंबई महापालिका प्रशासनाने आयआयटी रुरकीच्या प्राध्यापकांची मदत घेण्याचे ठरवले असून सोमवारी जलाशयाच्या दोन कप्प्यांची पाहणी करण्यात आली. रुरकी आयआयटीचे तीन प्राध्यापक आणि पालिकेचे प्रमुख अभियंता यांच्या पथकाने ही पाहणी केली. आधीच्या दोन अहवालांमधून निष्कर्ष काढून जलाशयाची पुनर्बांधणी करावी की दुरुस्ती आणि ती कशी करावी याबाबत निश्चित मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रुरकीच्या प्राध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी आयआयटी मुंबईने केलेल्या पाहणीत तज्ज्ञांचे एकमत न झाल्यामुळे आता पुन्हा एकदा पाहणी केली जात आहे. संपूर्ण दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आणला होता. मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर पालिका प्रशासनाने एक पुनर्विलोकन समिती स्थापन केली होती. पालिकेने आय.आय.टी. पवईचे चार प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी अशा आठ सदस्यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. पालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयाची डिसेंबर महिन्यात अंतर्गत पाहणी केली. जलाशयाची पुनर्बांधणी करायची की दुरुस्ती करायची या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित होते. त्यानुसार या समितीतील चार तज्ज्ञांनी आपला अंतरिम अहवाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पालिका आयुक्तांना सादर केला होता. पालिका प्रशासनाने या तलावाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तज्ज्ञांच्या समितीने आपल्या अहवालात पुनर्बांधणीचा मुद्दा फेटाळत किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. तसेच जलाशयाची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज नसल्याचेही अहवालात म्हटले होते. तसेच जलाशय सुस्थितीत असून योग्य देखभाल केल्यास पुढील अनेक वर्षे हा जलाशय सुस्थितीत राहील असेही यात म्हटले होते.

हेही वाचा – वेळेत खड्डे न भरणाऱ्या अभियंत्यांना प्रतिदिन हजार रुपये दंड करावा, भाजपच्या माजी नगरसेवकाची मागणी

अन्य चार सदस्यांमध्ये भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) मुंबईचे तीन सदस्य व पालिकेचे उपायुक्त यांचा समावेश होता. त्यांनी तज्ज्ञ समितीच्या चर्चेच्या आधारे तसेच, सर्व पैलूंचा विचार करून, मुंबईकर नागरिकांकडून प्राप्त झालेली पत्रे व ई-मेल आदी विचारात घेवून आपला अहवाल मार्च २०२४ मध्ये पालिका आयुक्तांकडे सादर केला होता. यामध्ये आयआयटीचे प्राध्यापक आर. एस. जांगिड, प्रा. व्ही ज्योतिप्रकाश, प्रा. दक्षा मूर्ती आणि पालिकेचे उपायुक्त सी. एच. कांडलकर यांचा समावेश होता. या चार जणांनी सादर केलेल्या अहवालास इतर चार सदस्यांनी असहमती दर्शवत त्यावर स्वाक्षरी केली नाही. आठ सदस्यांच्या समितीमध्ये दोन वेगवेगळे अहवाल देण्यात आल्यामुळे या विषयावरील गुंता अद्याप कायम आहे. आयआयटीच्या सदस्यांनी पर्यायी जलाशय बांधून मग सध्याचे जलाशय रिकामे करून त्याची दुरुस्ती व संरचनात्मक तपासणी करण्याची शिफारस केली होती. मात्र अन्य चार सदस्यांना ही शिफारस मान्य नसल्यामुळे अंतिम अहवालानंतरही याविषयाचा गुंता कायम आहे. त्यामुळे पालिकेने आता रुरकी येथील आयआयटीच्या प्राध्यापकांची मदत घेण्याचे ठरवले असून दोन दिवस जलाशयाची पाहणी करण्यात येणार आहे. सोमवारी दोन कप्प्यांची पाहणी करण्यात आली. तर मंगळवारी उर्वरित कप्प्यांची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर आयआयटी रुरकीच्या प्राध्यापकांनी आधीच्या दोन अहवालांवर निष्कर्ष काढणे अपेक्षित असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – अंधेरीतील बेपत्ता चार मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

पथकाकडून आणखी एक अहवाल नको …

या पथकाने नवा अहवाल देणे अपेक्षित नाही. तर त्यांनी अंतिम निष्कर्ष काढावा असे अपेक्षित आहे. जलाशयाची पुनर्बांधणी करावी की दुरुस्ती करावी, कधी करावी, कशी करावी याबाबतही मार्गदर्शन करावे, असे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईचा पाणीपुरवठा बाधित न होता, झाडेही वाचतील अशा पद्धतीने या कामाचे नियोजन कसे करता येईल हे या पथकाने सुचवणे अपेक्षित आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to rebuild malabar hill reservoir now after iit roorkee inspection aim to draw conclusions from the previous two reports mumbai print news ssb