Dadar Hanuman Temple News Update : दादर स्थानकावर विकासात्मक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असणारे सुमारे ८० वर्षे जुने हनुमान मंदिर हटवण्याची नोटीस मध्य रेल्वेकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आली होती. दरम्यान, या नोटिशीला आता स्थगिती देण्यात आली आहे. आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भाजपा मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार, विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होते. अधिकाऱ्यांना भेटून सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार, मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे”, असं माजी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. तसंच, केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं लोढा यांनी एक्सच्या पोस्टद्वारे सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले, “आदेश थेट रद्द करता येत नाही. त्यामुळे आधी स्थगिती आणून त्यानंतर रद्दचा आदेश देता येतो. त्यानुसार हा निर्णयही रद्द केला जाईल. त्यामुळे मंदिराचं आता काही होणार नाही. मंदिरात पूर्वीप्रमाणेच आरती सुरू राहणार.”
जय श्रीराम! जय हनुमान!
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 14, 2024
दादर (पूर्व), मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १२ येथील स्टेशनला लागून असलेल्या हनुमान मंदिराला आज भेट दिली. यावेळी मंदिर विश्वस्थांशी संवाद साधला आणि आरती केली.
मंदिराला निष्कासित करण्याच्या नोटीसला तात्काळ रद्द करण्यासाठी रेल्वेमंत्री श्री @AshwiniVaishnaw… pic.twitter.com/F9NgQnJtb4
आदित्य ठाकरेंची टीका
“उद्धव ठाकरेंनी भाजपाचं हिंदुत्त्व एक्स्पोज केल्यानंतर रेल्वेने त्यांची नोटीस स्थगित केली आहे. भाजपाच्या लोकांनी तिथे जाऊन नाटक केलं. स्थगिती हस्तलिखिताने आली आहे. म्हणजे घाईघाईने घेतलेला हा निर्णय आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मंदिर का हटवले जाणार होते?
दादर स्थानकात बदल करण्यासाठी पूर्वेकडील पादचारी पुलाशेजारी असलेले हनुमान मंदिर हटविण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने पाठवली होती. मध्य रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता (कार्यालय), भायखळा यांनी नोटिसीमध्ये म्हटले होते की, अनधिकृत मंदिरामुळे प्रवाशांची सुरळीत हालचाल, वाहनांची वाहतूक आणि दादर स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मंदिर पाडून रेल्वेची जागा रिकामी करण्याचे निर्देश विश्वस्तांना दिले. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी चांगल्या पायाभूत सुविधा आणि सुलभतेची आवश्यकता आहे, असे सांगून या निर्णयाचे समर्थन केले. काहींनी मंदिर तिथेच असावे, असे बोलून रेल्वेच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला.