मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असले तरी जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, असे सांगत योग्यवेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केल्याने वाढीव अनुदान कधी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
लाडक्या बहीण योजनेसाठी देण्यात येणारे २१०० रुपये अनुदान हे अधिवेशन काळात दिले जाईल किंवा त्याची अर्थसंकल्पात तरतूद करु, असे कोणतेही वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले नाही. जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
‘बहीण सावत्र कशी झाली?’
अनुदान कधी दिले जाईल याचे स्पष्ट उत्तर देण्याचे तटकरे यांनी टाळले. लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार या विरोधकांच्या प्रश्नावर त्यांनी विरोधक सत्तेवर आल्यानंतर तीन हजार रुपये कसे देणार होते, असा प्रतिसवाल केला. राज्यातील लाडक्या बहिणींची मते घेऊन सत्तेत आलेले महायुती सरकार लाडक्या बहिणींना अपात्रतेचे निकष आता का लावत आहेत. अर्जांची छाननी करुन लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? निवडणूकीपूर्वी लाडकी असलेली बहीण सावत्र कशी झाली, अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अॅड. अनिल परब व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली.
महिला दिनी दोन महिन्यांचे अनुदान
फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपयांचे अनुदान जागतिक महिला दिनी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहितीही आदिती तटकरे यांनी दिली. फेब्रूवारीचे अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दा काँग्रेसचे सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता.