काँग्रेस-राष्ट्रवादीला काही विधायक कामे करता येत नसल्यामुळे खोटे आरोप करून भाजपला बदमान करण्याचे उद्योग सुरू आहेत. एका दिवसात २०६ कोटींची खरेदी करण्यासाठी २४ शासकीय आदेश जारी केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. गोरगरीबांना शैक्षणिक साहित्य व पौष्टिक आहार मिळावा यासाठीच मी हे आदेश काढले असून, यापुढेही जेव्हा आवश्यकता निर्माण होईल तेव्हा एका दिवसात लोकहिताचे अनेक निर्णय मी घेईन, असे प्रत्युत्तर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या आरोपावर दिले आहे.
खरेतर एकाच दिवासत एवढे धडाकेबाज निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. परंतु काँग्रेसकडून याची अपेक्षा करता येणार नाही. कायम घोटाळ्यात गुंतलेल्या काँग्रेसला आणि घरभेद्यांना चांगल्या निर्णयातही घोटाळाच दिसणार, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला. अंगणवाडय़ांमधील तीन ते सहा वर्षांच्या १७ मुलांसाठी हे निर्णय मी घेतले असून सर्व नियमांचे पालन यात करण्यात आले आहे असेही पंकजा यांनी लंडन येथून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
ज्या दरकराराच्या आधारे मी खरेदीचे आदेश काढले ते दरक रार मागील सरकारच्या काळात काढण्यात आले होते. एवढेच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तत्कालीन मंत्र्यांनी मी केलेल्या खरेदीपेक्षा जास्त खरेदी टप्प्या टप्प्याने केली आहे. मुदलात एकाच वेळी लोकांच्या डोळ्यात येईल असे २४ आदेश काढून कोणी २०६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करेल का, एवढा साधा विचारही माझ्यावर आरोप करताना काँग्रेसच्या नेत्यांनी केला नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. हा सर्व निधी अंगणवाडय़ांना पौष्टिक आहार देण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. काही घरभेदी यामागे असल्याचे (विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे) नाव न घेता त्यांनी सांगितले. हे घरभेदी स्वत: घोटाळ्याच्या चिखलात रुतले असल्याने काँग्रेसच्या आडून बिबुडाचे आरोप करण्याचे उद्योग करत असल्याचा टोलाही लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा