लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीला राज्यातील करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत होता. त्याच वेळी सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्याअखेरीस राज्यातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या एक हजारवर पोहोचली होती. त्यावेळी सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारापार गेली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
राज्यामध्ये मार्चपासून करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील ही वाढ एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्याअखेरपर्यंत कायम होती. त्यानंतर राज्यातील करोना रुग्णांची संख्या एक हजारावर पोहोचली होती. तसेच करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० च्या घरात हाेती. करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्यांपेक्षा कमी होती.
हेही वाचा… मुंबई: दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन
दिवसेंदिवस करोना रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला होता. १५ ते २३ एप्रिलदरम्यान राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारांहून अधिक होती. मात्र एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यानंतर हळूहळू करोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. त्याच वेळी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होऊ लागली.
हेही वाचा… मुंबईः पत्नीला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न,दोघेही गंभीर भाजले
मात्र तरीही सक्रिय रुग्णांची संख्या अधिक होती. मागील सात दिवसांपासून करोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. २७ एप्रिल रोजी ४,८०० च्या घरात असलेली सक्रिय रुग्णांची संख्या सात दिवसांनंतर तब्बल २,९३९ इतकी कमी झाली आहे. म्हणजेच मागील सात दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत दोन हजारांनी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात ३ मे रोजी ७१० करोना रुग्ण बरे झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या ४,९३९ इतकी कमी झाली आहे.