शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या करोनाबाधितांचे प्रमाण मुंबईत गेल्या काही दिवसांत काही अंशी कमी झाले आहे. मात्र असे असले तरी मागील दोन आठवड्यांत मृत्यूचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाल्यानंतर मुंबईत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दरदिवशीच्या रुग्णांची संख्या जवळपास १० ते ११ हजार होती. दुसऱ्या आठवड्यापासून यात हळूहळू घसरण झाली असून मागील दोन दिवसांत तर हे प्रमाण सुमारे साडेपाच हजारांपर्यंत खाली आले आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मुंबईतील मृतांचे प्रमाण मात्र मागील दोन आठवड्यांत वाढले आहे.

शहरातील रुग्णसंख्या मागील दोन महिन्यांत झपाट्याने वाढल्याने मुंबईच्या एकूण मृत्युदरात घसरण होत असून दोन टक्क्यांपर्यंत मृत्युदर खाली आला आहे. परंतु आठवड्यातील मृत्युदराचा आलेख मात्र वर जात आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचा मृत्युदर ०.५० टक्के होता, तर तिसऱ्या आठवड्यात हे प्रमाण ०.८६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

एप्रिल महिन्यात मुंबईत जवळपास एक हजार मृत्यू झाले असून यातील बहुतांश मृत्यू ७० ते ८० वयोगटातील आहेत. मृत्यूचे प्रमाण मागील दोन आठवड्यांत वाढले आहे. हे रुग्ण साधारण दोन आठवड्यांपूर्वीचे आहेत. ज्या रीतीने मुंबईची रुग्णसंख्या कमी होत आहे, हीच स्थिती जर पुढील काही आठवडे कायम राहिली तर मृत्युदरही पुन्हा कमी होईल, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

मागील दोन आठवड्यांत रुग्णांना अतिदक्षता खाटा मिळण्यास झालेला उशीर, प्राणवायूची कमतरता आणि प्राणवायूच्या खाटा मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड यांमुळेही काही रुग्णांना वेळेत उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याचे खासगी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

अधिक मृत्यू कुठे?

मुंबईत एप्रिल महिन्यात बहुतांश मृत्यू डोंगरी (बी), मरिन लाइन्स (सी), परळ (एफ दक्षिण), एलफिन्स्टन (जी दक्षिण), सांताक्रूझ (एच पूर्व),चेंबूर (एम पश्चिम), घाटकोपर (एन), भांडुप (एस) या भागांत नोंदले आहेत.

‘प्राणवायूच्या पातळीवर

लक्ष देणे गरजेचे’

पहिल्या आठवड्याच्या शेवटी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असून दुसऱ्या आठवड्यात त्यांची प्रकृती गंभीर होते आणि यातील काही रुग्णांचा मृत्यू होतो असे प्राथमिक पाहणीतून निरीक्षणास आले आहे. अजूनही अनेक रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होत आहेत. गृह विलगीकरणात असले तरी प्राणवायूच्या पातळीवर लक्ष देणे आवश्यक आहे. पातळी कमी झाल्यास तातडीने प्राणवायूसह रुग्णालयीन उपचार उपलब्ध झाल्यास धोका टाळणे शक्य आहे, असा सल्ला डॉ. सुपे यांनी दिला.

ठाणे जिल्ह््यात ३ हजार १०२ रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह््यात सोमवारी ३ हजार १०२ करोना रुग्ण आढळून आले, तर ५८ जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह््यातील रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. जिल्ह््यात आतापर्यंत ४ लाख ५३ हजार ६८९ रुग्ण आढळून आले असून मृतांची संख्या ७ हजार ३३६ इतकी झाली आहे. जिल्ह््यातील ३ हजार १०२ करोना रुग्णांपैकी कल्याण डोंबिवली ८५४, ठाणे ६९८, नवी मुंबई ४५५, मीरा भाईंदर ४१९, ठाणे ग्रामीण २२४, बदलापूर २०५, अंबरनाथ १११, उल्हासनगर ८४ आणि भिवंडीत ५२ रुग्ण आढळून आले. तर ५८ मृतांपैकी बदलापूर ११, कल्याण डोंबिवली नऊ, नवी मुंबई नऊ, मीरा भाईंदर नऊ, ठाणे आठ, अंबरनाथ पाच, ठाणे ग्रामीण चार आणि उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण आढळून आले.

बहुतांश मृत्यू दहा दिवसांनंतर

मुंबईत करोनाच्या पहिल्या लाटेत ४० टक्के मृत्यू हे रुग्ण दाखल झाल्यापासून दोन दिवसांत होत होते. रुग्ण अचानकपणे कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनाही वारंवार घडत होत्या. परंतु दुसऱ्या लाटेत मात्र याचे स्वरूप बदलले आहे. आता २० टक्के मृत्यू हे पहिल्या दोन दिवसांत होत असून बहुतांश म्हणजे जवळपास ४० टक्के मृत्यू दहा दिवसांनंतर होत आहेत. यात बहुतांश मृत्यू फुप्फुसाचा संसर्ग वाढल्याने, श्वसनसंस्था निकामी झाल्याने होत असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

रुग्णसंख्या     मृत्यू   आठवड्याचा मृत्युदर

मार्च

पहिला आठवडा  ९७९१   २८ ०.२९

दुसरा      १६,८९७ ४८ ०.२८

तिसरा      ३२,८९५ ६९ ०.२१

चौथा       ४९,६८४ १०९ ०.२२

एप्रिल

पहिला आठवडा  ६९,०३७ १९० ०.२८

दुसरा      ६०,५०६ ३५७ ०.५९

तिसरा      ५११२८  ४२५ ०.८३