मुंबई : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांमध्ये घट झाली आहे. यामध्ये तंबाखूचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत ४.८ टक्के, धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत २.८ आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांचे प्रमाण यात ३.२ टक्के इतकी घट झाली आहे.
तंबाखूमुक्त राज्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. यामध्ये नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देणे, चर्चासत्र भरविणे, लोकांचे समुपदेशन करणे अशा अनेक कार्यक्रमांचा सहभाग असतो. जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयामार्फत नुकतेच विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आरोग्य सेवा संचालनालयाच्या मौखिक आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. सुनीता दीक्षित यांनी माहिती देताना आरोग्य विभागाकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाविरोधात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना काही अंशी यश येत असल्याचे सांगितले. २००९-१० मध्ये राज्यामध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण ३१.४ इतके होते. ते प्रमाण २०१६-१७ मध्ये ३६.६ इतके म्हणजेच ४.८ टक्क्यांनी कमी झाले. तसेच धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण २००९-१० मध्ये ६.६, तर २०१६-१७ मध्ये हे प्रमाण ३.८ टक्के म्हणजेच २.८ टक्क्यांनी कमी झाले. त्याचप्रमाणे गुटखा व अन्य पुडीबंद तंबाखू पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची संख्या २००९-१० मध्ये २७.६ इतकी होती. ते २०१६-१७ मध्ये २४.४ टक्के इतके कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
१२ ते १८ वयोगटातील मुलांचे प्रमाण ५ टक्के..
राज्यातील तरुण पिढी व अल्पवयीन मुलांचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्याकडे कल मागील काही वर्षांपासून वाढत आहे. सध्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यामध्ये राज्यातील १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण ५.१ टक्के इतके आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण ५.८ टक्के, तर मुलींचे प्रमाण ४.४ टक्के इतके असल्याची माहिती उपसंचालिका डॉ. सुनीता दीक्षित यांनी दिली.