मुंबई : मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट जरी झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता. शुक्रवार हा तब्बल सात वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईकरांना शुक्रवारी पहाटे किमान तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र, संपूर्ण दिवसभर मुंबईत उष्णतेच्या झळांचा सामना मुंबईकरांनी केला. उष्ण वारे नागरिकांनी अनुभवले. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शुक्रवारी ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे शुक्रवार हा सात वर्षांनी जानेवारी महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. यापूर्वी १७ जानेवारी २०१७ मध्ये सांताक्रूझ केंद्रात ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. सांताक्रूझ येथे शुक्रवारी नोंदले गेलेले कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ५.२ अंशांनी अधिक होते. मुंबईत दुपारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबईत शुक्रवारी सकाळी किमान तापमान घटले होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी किमान तापमानात ४ अंशांनी घट झाली होती. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र दिवसभरातील उकाडा आणि उन्हाच्या झळांनी मुंबईकरांना हैराण केले. मुंबईत बऱ्याच दिवसांनंतर किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर हा दिलासा मिळेल, अशी आशा मुंबईकरांमध्ये निर्माण झाली. मात्र, उपनगरांमध्ये कमाल तापमानाचा पारा चढाच होता. वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव अधिक होत होती. कुलाबा येथे शुक्रवारी ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. जानेवारी महिन्यात सरासरी कमाल तापमान ३० – ३१ अंश सेल्सिअस इतके असते.

हेही वाचा…मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : दुबईला पळण्याच्या तयारीत दोघांना गुजरात विमानतळावरून अटक

दरम्यान, सध्या पूर्वेकडून मजबूत वारे वाहत असल्याने मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. ही परिस्थिती साधारण दोन दिवस राहील. त्याचबरोबर रात्री उत्तरेकडून वारे वाहत असल्याने मुंबईच्या किमान तापमानात घट होत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

यापूर्वी सांताक्रूझ येथे नोंदवण्यात आलेले कमाल तापमान

२०१३ – ३४.६ अंश सेल्सिअस

२०१४ – ३४.९ अंश सेल्सिअस

२०१६- ३७.३ अंश सेल्सिअस

२०१७- ३६ अंश सेल्सिअस

२०१८- ३५.६ अंश सेल्सिअस

२०२०- ३४.५ अंश सेल्सिअस

२०२१ – ३५.३ अंश सेल्सिअस

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrease in mumbai s minimum temperature maximum temperature remained high mumbai print news sud 02