वातावरणात कितीही प्रदूषणकारी घटक ओतले तरी सकाळी वातावरण स्वच्छ करून देणारी समुद्रावरील हवा मुंबईकरांच्या मदतीला उन्हाळ्यातही धावून आली आहे. मार्चच्या पूर्वार्धात उन्हाने भाजून निघालेल्या मुंबईची हवा सध्या समुद्रावरील वाऱ्यांमुळे काहीशी थंडावली आहे. 

मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या तुलनेत पश्चिमेकडून येणारे दमट वारे क्षीण पडले होते. दुपारी उशिरा दीड-दोनच्या सुमारास हे वारे वाहत. मात्र तोपर्यंत तापमापकातील पारा वर चढलेला असे. आता मात्र स्थिती पूर्वपदावर आली आहे. ‘‘मुंबईनजीकच्या अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे सध्या उत्तरेकडून तुलनेने थंड वारे शहरापर्यंत पोहोचत आहेत. दुपार होण्यापूर्वी समुद्रावरून दमट व तुलनेने थंड वारे जमिनीवर येत असल्याने तापमान ३०-३२ अंश से. दरम्यान राहत आहे,’’ असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. सोमवारी सांताक्रूझ येथे ३१, तर कुलाबा येथे २९ अंश से. तापमान होते. रविवार व शनिवारीही कमाल तापमान अनुक्रमे ३२.७ आणि ३०.६ अंश सें. नोंदले गेले.

Story img Loader