मुंबई : म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या घटस्फोटीत अर्जदारास नोंदणीच्या वेळीच डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर पती वा पत्नीचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्रही सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोडतीच्या संगणकीय प्रणालीत यासंबंधीचे बदल करण्यात आले आहेत. अर्जदारांकडून वा विजेत्यांकडून अनेकदा लग्नासंबंधी, पत्नी-पत्नीच्या उत्पन्नासंबंधी वा घटस्फोटासंबंधीची माहिती लपविणे किंवा खोटी माहिती देणे यासारख्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
म्हाडा सोडतीत सहभागी होण्यासाठी निश्चित अशी उत्पन्न मर्यादा लागू होते. ही उत्पन्न मर्यादा निश्चित करताना कौटुंबिक उत्पन्न अर्थात पती-पत्नीचे उत्पन्न ग्राह्य धरले जाते. मात्र अनेकदा मोठ्या संख्येने अर्जदार अल्प वा अत्यल्प गटात समाविष्ट होण्यासाठी लग्नासंबंधीची माहिती लपवतात वा खोटी माहिती देतात. अनेकदा पती-पत्नी एकत्र रहात असतानाही घटस्फोट झाल्याचीही माहिती देण्यात येते. पती वा पत्नी हयात नसल्याचेही नमूद करण्यात येते. पती-पत्नीच्या उत्पन्नाबाबतची माहिती लपवून हव्या त्या उत्पन्न गटातील घर घेण्यासाठी हे प्रकार होत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, घटस्फोटीत अर्जदारास डिक्री प्रमाणपत्र, तसेच पती-पत्नीचा मृत्यू झालेल्या अर्जदारास मृत्यू प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचा पर्याय संगणकीय प्रणालीत अद्यापपर्यंत उपलब्ध नव्हता. याचाच फायदा घेऊन अनेक अर्जदार म्हाडाची फसणवूक करीत असल्याचे मागील काही सोडतीत समोर आले आहे. अशा अंदाजे ७० अर्जदारांची घरे रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा >>>“एकाच वेळी मुसळधार पाऊस अन्…”, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहर तुंबण्याचं कारण; स्थितीवर मात कशी करणार? म्हणाले…
या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता संगणकीय प्रणालीतील या त्रुटी दूर केल्या आहेत. त्यानुसार आता अर्ज भरताना घटस्फोटीत, विधवा-विधूर असे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. तर या पर्यायांपुढे संबंधित प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचा पर्याय असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घटस्फोटीत अर्जदार असल्यास अर्ज भरतानाच डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. तर पती वा पत्नीचा मृत्यू झाला असल्यास संबंधित अर्जदाराला मृत्यू झालेल्या जोडीदाराच्या मृत्यूचा दाखला जोडणे आवश्यक असणार आहे. हा महत्त्वपूर्ण बदल मुंबई मंडळाच्या ऑगस्टच्या सोडतीपासून लागू होणार असल्याचीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महत्त्वाचे म्हणजे अविवाहित अर्जदारांनाही आता अर्ज करतानाच अविवाहित असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही जोडावे लागणार आहे.