मुंबई : पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानात मंगेशकर रुग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी सोमवारपर्यंत डॉ. घैसास यांना स्पष्टीकरण देण्याबाबत परिषदेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे डॉ. घैसास यांच्यासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना अनामत रक्कम भरणे शक्य न झाल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. या महिलेचा मृत्यू झाल्याने पुण्यासह राज्यभरात पडसाद उमटले. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला नोटीस पाठविली होती. यामध्ये संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मागविण्यात आली होती. रुग्णालय प्रशासनाने परिषदेला दिलेल्या उत्तरामध्ये प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असून, यामध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडे हे प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिषदेने डॉ. सुश्रुत घैसास यांना आपली बाजू मांडण्यासंदर्भात गुरूवारी नोटीस पाठवली असून, त्यांच्याकडून सोमवारपर्यंत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
डॉ. सुश्रुत घैसास यांचे स्पष्टीकरण आल्यानंतर त्यावर तातडीने चौकशी समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही चौकशी समिती डॉ. घैसास यांच्या स्पष्टीकरणाचा अभ्यास करून त्यांना परिषदेच्या कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी करणार आहे. या चौकशीमध्ये उघडकीस येणाऱ्या तथ्यांवरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी यांनी दिली.
काय आहे प्रकरण
प्रसूतीचा त्रास होत असलेल्या तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना १० लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. मात्र, तीन लाख रूपये देतो, असे सांगूनही तनिषा भिसे यांच्यावर उपचार सुरू केले नाहीत. पैसे नसल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरूनच गर्भवती महिलेला परत पाठवल्याने ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकली नाही. परिणामी, योग्य वेळी उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर केला होता. याप्रकरणी सरकारने नेमलेल्या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवला आहे. यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. या प्रकरणामुळे पुण्यासह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.