शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आधी सुरत आणि तेथून गुवाहटीला गेले. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. शनिवारी (२५ जून) पहिल्यांदाच बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहटीमधून ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. “आम्ही उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा काँग्रेस राष्ट्रावादीसोबत राहू नये सांगितलं, पण त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही,” असा आरोप केसरकर यांनी केला.
दीपक केसरकर पुढे म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत राहू नये असं अनेक वेळा सुचवलं होतं. आपल्या पक्षाची अधोगती होत आहे, असंही लक्षात आणून दिलं. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. परंतु, तरी देखील त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. एवढे लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य आहे ना? पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.”
“आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत”
“घटनात्मक तरतुदीनुसार दोन त्रुतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला तो आम्हाला मान्य नाही. आमचा नेता हा एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेलं नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
“लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करणं चुकीचं”
दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं जातं आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे कोणीही रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नाही. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.”
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं नेतृत्व ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे ५ ठराव
“शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीने हायजॅक केलं”
“शिवसेनेला बाकी कोणीही हायजॅक केलेलं नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच आम्हाला हायजॅक केलं होतं. त्यातून आम्ही बाहेर पडत आहोत. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. ते कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत. अजूनही आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे,” असं केसरकर यांनी सांगितलं.