जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. विरोधकांनीही आंदोलकांवरील लाठीमारच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केलीय. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (८ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “मराठा समाजाइतका प्रगल्भ समाज संपूर्ण भारतात नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, परंतु एकही दगड उचलला गेला नाही ही वस्तूस्थिती आहे. उपोषणकर्त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करणे एवढ्यापुरती ती बाब मर्यादीत होती. त्यांना रात्रीच रुग्णालयात दाखल करू असं सांगण्यात आलं. त्यावर त्यांनी उद्या दुपारी रुग्णालयात दाखल होतं असं सांगितलं.”
“…म्हणजे हा काहीतरी कटही असण्याची शक्यता आहे”
“दुसऱ्या दिवशी प्रशासनाचे अधिकारी मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले त्यावेळी मराठा समाजाने दगडफेक केली नाही, दुसऱ्या कुणीतरी तिथं येऊन दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. म्हणजे हा काहीतरी कटही असण्याची शक्यता आहे,” अशी शंका दीपक केसरकांनी व्यक्त केली.
“तेव्हा दगडफेक झाली नाही, आजच का”
दीपक केसरकर पुढे म्हणाले, “मराठा समाज कधीच दगडफेक करणार नाही. एवढे लाखांचे मोर्चे निघाले तेव्हा दगडफेक झाली असती ना. तेव्हा दगडफेक झाली नाही, आजच का झाली याचा विचार केला पाहिजे. पोलिसांवर दगडफेक करायची आणि २५-३० पोलीस जखमी झाले की लाठीमार होणार हे ठरवून केलं. हे कुणी केलं हे मला माहिती नाही. मात्र, हे मराठा समाजाने निश्चित केलेलं नाही.”
“लाठीमार करण्याचे आदेश कुणी का देईल”
“मराठा समाजावर लाठीमार झाला म्हणून पोलिसांवरही कारवाई झाली. एवढं करूनही त्यात राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. असे लाठीमार करण्याचे कुणीही आदेश देणार नाही. असे लाठीमार करण्याचे आदेश कुणी का देईल. लोकांना ही वस्तूस्थिती माहिती नाही की, रात्रीऐवजी दुपारी रुग्णालयात दाखल व्हायचं ठरलं होतं. ते होऊ शकलं नाही आणि पुढचा सगळा भाग आहे,” असं मत दीपक केसरकरांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस, मी जेव्हा…”; अण्णा हजारेंचा उल्लेख करत राऊतांचा हल्लाबोल
“आम्हाला सगळ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीबद्दल काळजी”
“असं असलं तरी आम्हाला सगळ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीबद्दल काळजी आहे. ते सुखरुप रहावेत हीच त्यामागील भावना होती. त्यामागे दुसरी कोणतीही भावना नव्हती,” असंही केसरकरांनी नमूद केलं.