शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार गुवाहाटीत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिंदे गट असे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला २४ तासात मुंबईत येण्याचं आवाहन केलं. मात्र, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार मुंबईत आले नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुंबईत कधी येणार असा प्रश्न बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी बंडखोर गटाची भूमिका स्पष्ट केली. ते गुवाहटीमधून ऑनलाईन पद्दतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “जेव्हा आम्ही आमदार इकडे आलो तेव्हापासून महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात आमची कार्यालयं फोडली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आम्ही इकडे आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं जातं आहे. हे चुकीचं आहे. कोणीही रस्त्यावर उतरण्याची गरज नाही.”
“आम्ही सेनेतच, वेगळी चर्चा करण्याची गरज नाही”
“आम्ही महाराष्ट्रातून इकडे आल्यानंतर माध्यमांशी खूप कमी बोललो. मला एकनाथ शिंदे यांनी तुम्ही माध्यमांशी अधिकृत बोला असं सांगितलं आहे. काही दिवसांपासून सर्वांचा एक गैरसमज आहे की, आम्ही शिवसेनेत आहे की नाही? आम्ही सेनेतच आहोत. त्यामुळे कोणी वेगळी चर्चा करण्याची गरज नाही,” असं केसरकर यांनी नमूद केलं.
“उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं, पण…”
दीपक केसरकर पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं की, आपण ज्यांच्या सोबत होतो त्यांच्यासोबत राहू नये. आपल्या पक्षाची अधोगती होत आहे. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. परंतु, तरी देखील त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. एवढं लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य आहे ना? पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.”
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं नेतृत्व ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे ५ ठराव
“आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत”
“घटनात्मक तरतुदीनुसार दोन त्रुतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला तो आम्हाला मान्य नाही. आमचा नेता हा एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेलं नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.