कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत नारायण राणेंवर आक्रमक शब्दांत टीका केली. राणे सध्या माझ्यावर कृतघ्न असल्याचा आरोप करत असले, तरी एकेकाळी त्यांच्या मुलासाठी आपण निवडणुकीत मेहनत घेतल्याचा त्यांना बहुतेक विसर पडला असावा. मुख्यमंत्रीपद देणाऱ्या शिवसेनेचे चांगलेच पांग फेडणाऱ्या नारायण राणेंना मला कृतघ्न बोलण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे केसरकर यांनी म्हटले. कोकणातील नारायण राणेंच्या दहशतीविरुद्ध आवाज उठवल्याने राणेंपासून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप केसरकर यांनी पत्रकारपरिषदेत केला. तसेच चेंबुर मधील हऱ्या- नाऱ्या गॅगचा सुत्रधार कोण? याचा गृहमंत्र्यांनी जरा तपास करावा, अशी मागणी करत केसरकरांनी राणेंच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुद्दा उपस्थित केला. राणेंसारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने जागा दाखवून द्यावी , असे आवाहनसुद्धा केसरकर यांनी केले. नारायण राणे यांनी आपल्यावर वैयक्तिक आरोप करताना अत्यंत खालची पातळी गाठल्याचे सांगत, आपण राणेंविरूद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Story img Loader