मुंबईतल्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने जागा नाकारण्यात आल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेवरून मराठी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तृप्ती देवरुखकर यांना ऑफिस थाटण्यासाठी जागा हवी होती. परंतु, मराठी नॉट अलाऊड म्हणत त्यांना मुलुंडमधील एका सोसायटीने जागा नाकारली. एका गुजराती पिता पुत्राने ही मुजोरी दाखवली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई झाली आहे. असे प्रकार पुन्हा आढळले तर आम्ही त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करू. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मराठी माणसाला फ्लॅट नाकारणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळात कोणालाच अशा प्रकारे घर नाकारू नये.” दीपक केसरकर एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, या घटनेला एकनाथ शिंदे आणि भाजपा जबाबदार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या या टीकेलाही दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. केसरकर म्हणाले, संजय राऊत हे कशाचाही संबंध कशाशीही जोडतात. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु, असे प्रकार घडता कामा नयेत.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, यात एक शक्यता असते की काही लोक शाकाहारी असतात आणि बहुतांश महाराष्ट्रीय लोक (मराठी माणसं) मांसाहारी असतात. त्यामुळे असे प्रश्न उद्भवतात. परंतु, कोणालाही असं करण्याचा अधिकार दिलेला नाही. कोणी कसं राहावं, काय खावं, हे ज्याचं-त्याचं स्वातंत्र्य आहे. असं काही झालं तर त्यावर कारवाई होणारच.

Story img Loader