दोन दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला ‘टेस्ट ट्यूब बेबी’ म्हणत डिवचलं होते. देवेंद्र फडणवीसांनी मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबीला मांडीवर बसवलं आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री हे टेस्ट ट्यूब बेबी नसून तुमचे बाबा आहेत, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले दीपक केसरकर?
विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांनी अडीच वर्षात काय केलं, हे त्यांना सांगता येत नाही. आज केवळ लोकांशी दिशाभूल करणं सुरू आहे. एखादा मुद्दा उचलून आम्हाला बदनाम करण्याचे काम सध्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर केली.
हेही वाचा – “काही नॉटी मुलं…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची टोलेबाजी!
पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत आमच्या मुख्यमंत्र्यांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणाले. मात्र, ते बेबी नाही तर तुमचे बाबा आहेत. तुम्हाला त्यांनी हाकलून लावलं असतं. त्यांच्या स्वाभिमानाला ठाकरे गटाने धक्का दिला. युवा सेनेचे लोकं आमच्यावर पाळत ठेवत होते. आमच्या मागे गाड्या घेऊन फिरत होते. आमच्या घरावर पहारा देत होते. ही कोणती पद्धत आहे. मुळात आमचा स्वाभिमान किती जाज्वल्य आहे, याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या काळात दिसून येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राज्यात लवकरच आम्ही ‘पीएमश्री’ या शाळा सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मुलं कॉपी करतात. त्यामुळेच आम्ही राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवणार असल्याचेही ते म्हणाले.