गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात, साधारण यॉट क्लबच्या समोर ‘धनराज महल’ नावाची दिमाखदार इमारत आहे. रंग मळखाऊ तपकिरी असला तरी, रीगल सिनेमा आणि राज्य पोलीस मुख्यालय यांपैकी कुठल्याही फुटपाथवरून गेटवेकडे चालत जाताना डाव्या बाजूची ही चिनी शैलीची इमारत नजरेत भरतेच. तिच्या प्रवेशद्वारातून आत जाऊन सरळ चालत गेलं की, अगदी अखेरीस डाव्याच- पण सरळ समोरच्या बाजूला ‘तर्क’ या कलादालनाची बेल वाजवायची. दार उघडल्यावर ‘दीपक पुरी छायाचित्र-संग्रहा’तल्या निवडक फोटोंचा खजिनाच तुमच्यासमोर रिता झालेला असेल! हे सर्व फोटो, ‘फोटोजर्नालिझम’ या प्रकारातले आहेत. केवळ बातमीतला फोटो नव्हे, आर्थिक-सामाजिक वास्तव दाखवणारे आणि एक प्रकारे एखाद्या लेखासारखं काम करणारे हे एकेक फोटो आहेत. यापैकी अनेक फोटो हे यापूर्वीही भरपूर गाजलेले, ‘आयकॉनिक’ किंवा कोरल्या गेलेल्या प्रतिमांवत् ठरावेत, असे आहेत. दीपक पुरी यांनी संग्राहक या नात्यानं, योग्य ती किंमत मोजून ते एकत्र केले आणि त्यांपैकी निवडक फोटो ‘तस्वीर आर्ट्स’ या फोटोग्राफीला वाहिलेल्या कलासंस्थेनं देशभरच्या पाच शहरांत प्रदर्शनरूपानं मांडले. मुंबई हा या प्रदर्शन-साखळीतला शेवटचा टप्पा.

रघू राय, प्रशांत पंजियार, नमस भोजानी, दिवंगत रघुबीर सिंग अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय छायाचित्रकारांचे फोटो इथे आहेतच.. शिवाय, सेबास्तिओ साल्गादो, डिएटर लुडविग, रॉबर्ट निकल्सबर्ग, केन्रो इझु, जॉन स्टॅन्मेयर आदी विदेशी छायाचित्रकारांचाही समावेश या खजिन्यात आहे. एकंदर सुमारे २५ अव्वल छायाचित्रकारांचे किमान ५७ फोटो इथं आहेत. यापैकी साबास्तिओ साल्गादोचे अनेक फोटो भारतीयांना माहीत असतील; पण बाकीच्या विदेशी छायाचित्रकारांनी अफगाणिस्तान, श्रीलंका याही देशांमध्ये टिपलेलं वास्तव आपल्याला काहीसं अपरिचित असेल. उदाहरणार्थ, डिएटर लुडविग यांनी एक भयंकारी घटना टिपली आहे. मस्तक आणि फक्त छातीपर्यंतचाच भाग कापलेल्या अवस्थेत, आत्ताच हत्या झालेला एक माणूस जमिनीवर पडला आहे आणि भोवताली फक्त सावल्या असल्या तरीही त्या त्याच्या आप्तेष्टांच्या नसून त्याला मारणाऱ्या ‘सुरक्षा’ दलांतल्या माणसांच्या सावल्या आहेत. ही हिंसेची छाया कशाची? फोटोचं शीर्षक ‘तमिळ बंडखोर’ असं आहे. सेबास्तिओ साल्गादोनं धनबाद कोळसाखाणीत टिपलेले कभिन्नकाळे (मर्ढेकरांच्या शब्दांत : ‘नव्या मनूंतील गिरिधर पुतळा’ भासणारे) कोळसामजूर आजही रोखून पाहतात, अस्वस्थ करतात. पण लखनऊतल्या एका आरशाच्या दुकानाचा स्टॅन्मेयरनं टिपलेला फोटो, सकारात्मक बाजू दाखवतो.. कुठल्याही बाजूनं पाहा, माणसं कशी छान आपापल्या जगण्यात रंगून गेली आहेत!
हा खजिना केवळ माणसांच्या या गोष्टींसाठी सुद्धा पाहता येईलच. पण फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांनी तरी हे प्रदर्शन चुकवू नये.. फोटोंचा अगदी कोपरा न् कोपरा पाहावा, ही फ्रेम कशी सुचली किंवा कशी चटकन मिळवली असेल, यावर विचार करावा आणि मग आपण नवं काय करणार हे शोधावं!
दुसरा खजिना शहरांचा..
भायखळ्याच्या जिजामाता उद्यान (राणीबाग) आवारातलं, मुंबई महापालिकेच्या मालकीचं ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ अनेकांनी पाहिलं असेलच, पण दहाच रुपयांचं तिकीट काढून इथं पुन्हा जावं आणि अगदी मागल्या बाजूला, झाडांखालची फरसबंदी ओलांडून पुढल्या बैठय़ा कलादालनांमध्ये शिरावं.. इथं मार्टिन रोमर्स या डच छायाचित्रकाराचं ‘महानगरं’ (मेट्रोपोलीस) या विषयावरल्या रंगबिरंगी फोटोंचं प्रदर्शन नुकतंच सुरू झालंय. मुंबई, कोलकाता, चीनमधलं ग्वांग्झू, इंडोनेशियातलं जकार्ता, पाकिस्तानातलं कराची, बांगलादेशातलं ढाका.. अशी ही उभरती महानगरं आहेत. रोमर्स यांच्या छायाचित्रांची वैशिष्टय़ं नीट पाहिल्यास चटकन लक्षात येतील. हॉटेलात टेबलावर एखादी बशी जितक्या कोनातून आपण पाहतो, तितक्या कोनातून रोमर्स यांचा कॅमेरा अनेक छायाचित्रांत रस्त्यावरल्या वाहनाकडे पाहतो (सोबतचं छायाचित्र हे याला जरा अपवाद आहे) ..बहुतेक फोटो हे कुठल्या ना कुठल्या नाक्यावर, तिठय़ावर किंवा मोठय़ा रस्त्यावरच घेतलेले आहेत आणि रस्त्याचा विस्तारही त्यातून दिसतो आहे. तिसरं म्हणजे, या फोटोंमधून काही स्थावर आणि म्हणून स्थिर दिसणाऱ्या इमारती, दुकानपाटय़ा वगैरे गोष्टी सोडल्या, तर माणसं म्हणा- वाहनं म्हणा, हलताहेत! वेग आहे या महानगरांना.. तोच रोमर्स यांनी टिपलाय!
आजच संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास इथं गेलात, तर आधी प्रदर्शन पाहून मग संध्याकाळी सहा वाजता, सहेज राहल नावाच्या गुणी तरुण दृश्यकलावंतानं केलेली ५२ मिनिटांची प्रायोगिक फिल्म (किंवा मराठीत ‘कला-पट’) पाहता येईल. ओळखीच्या प्रतिमा फिल्मच्या कॅमेऱ्यानं टिपून त्यांना अगदी अनोळखी अर्थ देण्यात सहेज राहल पटाईत आहे! प्रेक्षकाच्या मनाशी कसा खेळ करायचा आणि एकच ‘संदेश’ वगैरे न देता प्रेक्षकाला कसं विचारप्रवृत्त करायचं, हेही सहेजला जमतं. त्यामुळे वेळ असेल, तर नक्की आजच जा.
छाया डोळस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा