अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसे नेते अखिल चित्रे यांनी त्यांच्या नावाबाबत केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. यावेळी दिपाली सय्यद यांनी “राज साहेबांचं लग्न झालं असतं आणि ते सासरी गेले असते तर त्यांचं नाव बदली झालं असतं की नाही? असा सवाल केलाय. तसेच माझ्या नावाचं किती भांडवल करणार, माझं नाव दिपाली सय्यद आहे की सोफिया सय्यद आहे एवढीच गोष्ट तुमच्याकडे आहे का? अशी विचारणाही मनसेला केली. त्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “राज साहेबांचं लग्न झालं असतं आणि ते सासरी गेले असते तर त्यांचं नाव बदली झालं असतं की नाही. हे कोणी बनवलं आहे? एखाद्या मुलीचं लग्न झालं की नवरा तिचं नाव बदली करतो हे संस्कार आहेत. त्याचप्रमाणे माझ्या नवऱ्याने माझं नाव लाडाने सोफिया ठेवलं.”
“माझ्या नवऱ्याची दुसरी किंवा तिसरी कुठलीही बायको नाही”
“मनसे माझ्या नावाच्या गोष्टीचं किती भांडवल करणार? मनसेकडे फक्त दिपाली सय्यद, सोफिया सय्यद एवढीच गोष्ट आहे का? आजपर्यंत, आत्तापर्यंत मी तशीच आहे. मी २५ वर्षांचा संसार केलाय. माझा नवरा आहे, एक मुलगा आहे, माझं पूर्ण कुटुंब आहे. माझ्या नवऱ्याची दुसरी किंवा तिसरी कुठलीही बायको नाही,” असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.
हेही वाचा : “अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं…”, राज ठाकरेंना टोला लगावणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचं आव्हान!
“यूट्यूब व इतर ठिकाणची माझ्या नावाविषयीची सर्व माहिती खोटी”
“यूट्यूब आणि इकडून तिकडून गोष्टी जमा केल्या जातात ते सर्व खोटं आहे. त्यामुळे या दोन नावांमध्ये गोंधळ नसलं पाहिजे. मुलीचं नाव बदलतं एवढंच. आत्ता आत्ता मुली पवित्र घेतात की मला नाव बदलायचं नाही. मलाही वाटतं मी आहे तशीच राहणार,” असंही दिपाली सय्यद यांनी नमूद केलं.