आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करून काँग्रेसने मित्रपक्षाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कराडचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या राज्यपालपदाच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत कराड मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे आताचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. आघाडीतील मित्रपक्ष दूर होत असताना राष्ट्रवादीने मात्र यूपीएबरोबर राहण्याची भूमिका घेतल्याने तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी नको म्हणून काँग्रेस नेतृत्वाने राष्ट्रवादीची मागणी मान्य करून श्रीनिवास पाटील यांना राज्यपालपद दिल्याचे मानले जात आहे. यूपीएचे सरकार सत्तेवर आल्यानंतर २००५ पासून राष्ट्रवादीच्या वतीने सातत्याने पक्षाच्या एखाद्या नेत्याला राज्यपालपदी संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. लातूरचे माजी नगराध्यक्ष प्रा. जनार्दन वाघमारे यांचे नावही राज्यपालपदासाठी राष्ट्रवादीच्या वतीने सुचविण्यात आले होते. शेवटी वाघमारे यांना राष्ट्रवादीने राज्यसभेवर संधी दिली.
देशात चार महाराष्ट्रीय राज्यपाल !
श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने देशात महाराष्ट्रातील चार जण विविध राज्यांमध्ये राज्यपालपदी नियुक्त झाले आहेत. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील हे पंजाबचे तर डी. वाय. पाटील हे बिहारचे राज्यपाल आहेत. सध्या राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या झारखंडच्या राज्यपालपदी माजी मंत्री डॉ. सय्यद अहमद हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा