मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेल्या पाणीसाठ्यात मागील १५ दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत तलावांमध्ये तिप्पट पाणीसाठा जमा झाला आहे.  मोडक सागर  आणि तानसा व तुळशी हे तलाव पूर्ण भरून वाहू लागले असून आता अन्य चार तलावही ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे मध्य वैतरणा धरणाचा एक दरवाजा मंगळवारी दुपारी उघडण्यात आला.

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही तलावांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेऊन वर्षभरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येतो.

तीन वर्षांचा २० जुलैपर्यंतचा जलसाठा

वर्ष —  साठा (दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी

२०२२        – १२,८०.८६८    …. ८८.५० टक्के

२०२१        –   ४,८०,७८३   …. ३३.२२ टक्के २०२०        – ३,९७,७०५     …..  २७.४७ टक्के

Story img Loader