मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांमधील महिला डब्यांमध्ये घाण करणाऱ्या विकृत व्यक्तीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने मंगळवारी मुंब्रा येथून अटक केली.
महिल्यांच्या डब्यात अनेकदा सकाळी मलमूत्र विसर्जन करून ते पसरून ठेवल्याचे आढळले होते. वारंवार घडणाऱ्या या प्रकाराचा उबग येऊन महिलांनी संबंधित गाडय़ा विविध स्थानकांत थांबवून ठेवण्याचे प्रकारही घडले होते. अखेर मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तपास करून एकाला अटक केली. या विकृत व्यक्तीला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला ४५०० रुपयांचा दंड आणि २५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
महिलांच्या डब्यात घाण पसरवण्याचे प्रकार मध्य रेल्वेवर वारंवार निदर्शनास आले होते. मात्र कोणती विकृत व्यक्ती अशी घाण पसरवते, याचा शोध रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला लागत नव्हता. गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रकार पुन्हा वाढले होते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने याबाबत विशेष मोहीम हाती घेतली.
या पथकाने मंगळवारी गोविंद भावसारे या ५० वर्षांच्या व्यक्तीला मुंब्रा येथून या प्रकरणी ताब्यात घेतले. भावसारे गेल्या दोन-तीन दिवसांपासून महिलांच्या डब्यात सकाळी सकाळी घाण करत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा