सुशांत मोरे

मेट्रोप्रमाणे रेल्वेच्या परिसरातही पादचारी पूल, सरकते जिने आदी विकासकामे एकाच वेळी सुरू असल्याने प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही कामे मार्चपर्यंत चालणार असल्याने तीन महिने तरी प्रवाशांना मनस्ताप सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.

मुंबईत एकाच वेळी विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. निवडणुका तोंडावर आल्याने रेल्वेनेही एकाच वेळी अनेक ठिकाणी विकासकामे सुरू केली आहेत. त्यामुळे रेल्वेचे फलाटही आक्रसू लागले असून प्रवाशांना गर्दी, चेंगराचेंगरीचा सामना करावा लागत आहे. या शिवाय बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊनच घर ते कार्यालय असा प्रवास करत आहेत.

लोअर परळ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल आणि सरकत्या जिन्याच्या कामामुळे प्रवाशांना दररोज गर्दीचा सामना करावा लागतो आहे. अशीच परिस्थिती रेल्वेच्या इतर स्थानकांमध्येही आहे. प्रवाशांना ही गर्दी एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची आठवण करून देते आहे. गर्दी हाताळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांबरोबरच अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना रेल्वेने पाचारण केले आहे. मात्र परिस्थिती हाताळण्यात ही यंत्रणा अपुरी ठरते आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर नवीन पूल, काही पुलांचे नूतनीकरणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य व पश्चिम रेल्वेवरील पुलांच्या कामांना गती दिली जात आहे. पुलांना सरकते जिनेही जोडले जात आहेत. मार्च २०१९ पर्यंत पश्चिम व मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत ७० (मध्यचे ४० आणि पश्चिमचे ३०) पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. यातील काही पुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. ती आणखी तीन महिने तरी चालतील. परंतु एकाच वेळी इतक्या मोठय़ा प्रमाणावर विकासकामे हाती घेण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था हाताळताना रेल्वेची त्रेधातिरपीट उडत आहे. विकासकामे करताना सुरक्षा उपाययोजना केल्या जात असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत लोअर परळ परिसरात उभे राहिलेली खासगी कार्यालये, रहिवासी संकुले यामुळे या स्थानकात मोठी गर्दी असते. याच स्थानकात बोरिवली दिशेला असलेल्या पादचारी पुलाला फलाट क्रमांक एकवर सरकता जिना जोडला जाणार आहे. त्यासाठी सध्या फलाटात पाया खोदण्यात येत आहे. त्याच्याच बाजूला पादचारी पुलाचेही काम सुरू होणार आहे. हा पूल फेब्रुवारी २०१९ पर्यंत सेवेत येईल. तोपर्यंत लोअर परळ स्थानकात प्रवाशांना मोठय़ा गर्दीचा सामना करावा लागणार आहे. अशी परिस्थिती पश्चिम व मध्य रेल्वेच्या इतरही काही उपनगरीय स्थानकांवर आहे.पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ स्थानकात पादचारी पूल बनत आहे.

वांद्रे, खार, मालाड पूल तीन दिवसांत सेवेत

* पुढील तीन दिवसांत वांद्रे, खार, मालाड, भाईंदर स्थानकात नवीन पादचारी पूल सेवेत

* जानेवारी २०१९ पर्यंत महालक्ष्मी स्थानकात दोन, वांद्रे स्थानकात एक, दोन मालाड आणि एक सांताक्रुझ स्थानकात एक पूल सेवेत

* फेब्रुवारी २०१९ पर्यंत माहिम व लोअर परळ स्थानकात पूल सेवेत

* आणखी १८ पादचारी पूल मार्च २०१९ पर्यंत सेवेत

* मध्य रेल्वेवर कर्जत, कसारा, खोपोली, इगतपुरी, लोणावळापर्यंत असलेल्या स्थानकांत ४० पादचारी पूल मार्च २०१९ पर्यंत सेवेत

सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जातात. लोअर परळही अपवाद नाही. गर्दी हाताळण्यासाठी सात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. अभियांत्रिकी विभागातील कर्मचारीही देखरेख ठेवतील. जवानांची संख्या वाढवण्यात येईल.

– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Story img Loader