लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. तर नुकताच एमएचटी-सीईटी, नीट-यूजी, जेईई-मेन या प्रवेशपूर्व परीक्षांचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. सध्या महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू आहे. मात्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा अद्यापही निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
काही अभ्यासक्रमांना प्रवेशपूर्व परीक्षेच्या गुणांसह बारावीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण आवश्यक असतात. काही विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी युवा सेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवून केली आहे.
हेही वाचा… राज्याची आर्थिक स्थिती गंभीर? शिक्षक शिक्षणासाठीचा निधी काटकसरीने वापरण्याची सूचना
‘अनेक अभ्यासक्रमांना प्रवेशपूर्व परीक्षेच्या गुणांसह बारावीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण आवश्यक असतात. काही विद्यार्थ्यांना पाच ते दहा गुण त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी अर्ज केलेला आहे. परंतु राज्य शिक्षण मंडळाने अद्यापही पुनर्मूल्यांकनाच्या निकालाबाबत कोणतीही प्राथमिक प्रक्रिया सुरू केलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल तात्काळ जाहीर करण्यात यावा, जेणेकरून सदर विद्यार्थी अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतील. पुनर्मूल्यांकनाच्या निकालाला विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास, युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.’ असा इशारा मुंबई विद्यापीठातील युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी दिला आहे.