मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे वाघनखे महाराष्ट्रात येण्यास आता मे महिना उजाडेल, असे सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे राज्यात आणण्याबाबत मोठी प्रसिद्धी केली होती. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात आणि त्यानंतर जानेवारीमध्ये वाघनखे भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मुनगंटीवार यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये व्हिटोरिया अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाशी सामंजस्य करार केला होता. नोव्हेंबर २०२३ पासून तीन वर्षे ही वाघनखे भारतात राहतील, असे त्यात नमूद करण्यात आले होते. वाघनखे नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात येतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. त्यानंतर जानेवारीचा वायदा करण्यात आला.
जानेवारीतही ही वाघनखे येणार नाहीत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च किंवा एप्रिलमध्ये वस्तुसंग्रहालयाशी राज्य सरकारचा करार होईल आणि मे अखेरीपर्यंत ती मुंबईत येतील, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही वाघनखे आणण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याची गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली असून सध्या हे प्रकरण परराष्ट्र खात्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. वस्तुसंग्रहालयाकडूनही ब्रिटिश सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकार व ब्रिटिश सरकारच्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर यासंदर्भातील करार होणार आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे मुनगंटीवार व राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्यावर उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे व इतरांनी त्याबाबत आक्षेप घेऊन पुरावे मागितले होते.
हेही वाचा : गोष्ट मुंबईची, भाग १४२: भूराजकीय महत्त्वाचे गेटवे ऑफ इंडिया आहे तरी कुठे?
राज्य सरकारचे म्हणणे…
राज्य सरकारने ६ व २६ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासननिर्णयात ही वाघनखे शिवाजी महाराजांची असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. मात्र, आता केंद्र सरकार व अन्य संबंधितांशी केलेल्या पत्रव्यवहारात राज्य सरकारने ही वाघनखे शिवकालीन असल्याचा उल्लेख केला आहे. ही वाघनखे सातारा येथील छत्रपतींच्या गादीवरील प्रतापसिंह महाराजांच्या पूजेत होती आणि साताऱ्याहून ती लंडनला गेल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.
हेही वाचा : मुंबई, ठाण्यात २०० औषध दुकानांत ‘फार्मासिस्ट’च नाहीत; अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद
शिवराज्याभिषेक दिनाआधी मुंबईत
ऐतिहासिकदृष्ट्या उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते व ते पुरेसे आहे. पण ती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती, का, याचे ऐतिहासिक पुरावे देता येणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र सरकारने आता ही वाघनखे शिवकालीन असल्याचा कागदोपत्री उल्लेख करण्यास सुरुवात केल्याने संदिग्धता निर्माण झाली आहे. मात्र, ही वाघनखे ६ जूनला असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाआधी मुंबईत दाखल होतील, असे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटींवर स्पष्ट केले.
राजकीय लाभ!
वाघनखे जानेवारीत दाखल झाली असती, तर भाजपसह सत्ताधारी पक्षांना लोकसभा निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती करून राजकीय लाभ मिळू शकला असता. आता ती मे अखेरीस येणार असल्याने विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
हवाई किंवा रस्तामार्गाने ती नेण्यासाठी आणि वस्तुसंग्रहालयातही कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी पोलिस महासंचालकांना आदेश देण्यात आले असून खासगी सुरक्षारक्षकही नियुक्त केले जाणार आहेत.
वाघनखे सातारा व कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय आणि मुंबईतील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येतील.