मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाल्याने पुलाच्या दुसऱ्या बाजूचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. परिणामी तुळई उभारण्यासाठी मे महिनाअखेरची मुदत पुढे ढकलावी लागणार आहे. याप्रकरणात महापालिका प्रशासन कंत्राटदाराकडून खुलासा मागवणार असून, तो समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
गोखले पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर एक बाजू १५ महिन्यांनी (२६ फेब्रुवारी) सुरू झाली होती. एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. सर्व भाग आल्यानंतर ते जोडून ३१ मेपर्यंत तुळई स्थापन करणे, पुलाचे पोहोच रस्ते तयार करणे आणि ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी सुरू करणे असे नियोजन करण्यात आले आहे. पुलाच्या तुळईचे ३२ सुटे भाग २२ एप्रिलपर्यंत मुंबईत येणे अपेक्षित होते व ३० एप्रिलपासून पुलाची जोडणी सुरू करण्यात येणार होती. मात्र अद्याप हे सर्व भाग आलेले नाहीत. त्यामुळे तुळई स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडणार आहे.
हेही वाचा – चेंबूरमध्ये आढळली चाळीस लाखांची रोकड
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, सुटे भाग आल्यानंतरच पुढील सर्व कामे अवलंबून आहेत. तुळई स्थापन करण्यासाठी क्रेन उभे करावे लागतात. त्यामुळे आधी पोहोचरस्ते तयार करता येत नाहीत. सुटे भाग जोडल्यानंतर रेल्वेकडून रुळांवरील कामांसाठी ब्लॉक घेतला जाईल, त्यानंतर तुळई स्थापन करून पोहोचरस्त्याची कामे केली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबाला येथील कारखाना हा रेल्वे प्रशासनाने प्रमाणित केलेला आहे. तुळईचे सुटे भाग येणास उशीर का झाला, याची कारणे कंत्राटदाराला विचारण्यात येतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सागरी किनारा मार्गावर वरळी येथे दोनपैकी एक तुळई स्थापन करण्यात आली, शिवाय दुसरी तुळई आणण्याचे नियोजन सुरू आहे. दोन्ही प्रकल्पाच्या तुळई एकाच कारखान्यातून येणार आहेत. असे असताना सागरी किनारा मार्गाचे काम वेळेत पूर्ण होते, पण गोखले पुलाची तुळई यायला वेळ का होतो?- धवल शाह, अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटना
हेही वाचा – जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर
कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात येईल. तो समाधानकारक नसल्यास कारवाई केली जाईल. तसेच नवीन वेळापत्रक ठरवून त्याचे काटेकोर पालन होईल याची काळजी घेतली जाईल. – अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका