दक्षिण मुंबईमधील गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या समाधीस्थान परिसराला स्वराज्यभूमी नाव दिल्यानंतर तेथे आजतागायत स्वराज्यभूमी नामफलक बसविण्यात आलेला नाही. अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकमान्य टिळकांची समाधी असल्यामुळे गिरगाव चौपाटीचे स्वराज्यभूमी असे नामकरण करावे, अशी मागणी समितीकडून सातत्याने करण्यात येत होती. सतत पाठपुरावा केल्यानंतर गिरगाव चौपाटीचे स्वराज्यभूमी असे नामकरण करण्यात आले. मात्र, हे नामकरण केवळ कागदोपत्री झाले आहे. प्रत्यक्ष समाधी स्थळावर स्वराज्यभूमी नामफलक बसविण्यात आलेला नाही. तसेच येथे लोकमान्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे चित्रशिल्परुपी स्मारक, टिळकांची जयंती-पुण्यतिथीदिनी शासकीय सन्मान, ध्वजस्तंभ उभारण्याची मागणी समितीकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – मुंबईत ‘ऑल आऊट ऑपरेशन’, ५१ फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
हेही वाचा – मुंबई: मध्य रेल्वेवर १५ डबा लोकलच्या अतिरिक्त फेऱ्यांना खिळ
लोकमान्यांच्या समाधी स्थानासमोर २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ध्वजवंदन करण्यात येणार आहे. अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले असून, कायर्क्रमाचे व्यवस्थापन मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे. या ध्वजवंदन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिलन यांनी केले आहे.