मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा मेमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जाहीर केले होते. मात्र आता हा मुहूर्त चुकला असून आरे – बीकेसीदरम्यान भुयारी मेट्रो प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सुरू असून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रक्रियेस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून पहिला टप्पा सेवेत दाखल करण्यासाठी जुलैअखेर उजाडणार आहे. एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी करीत आहे. ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या मार्गिकेच्या पूर्णत्वास विलंब झाला आहे. चालू वर्षात ही संपूर्ण मार्गिका सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरसी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा…कांदिवली, बोरिवलीत गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद

या मार्गिकेतील आरे – बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा मेमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल, असे एमएमआरसीकडून जाहीर करण्यात आले होते. याआधीही पहिल्या टप्प्यासाठी अनेक वेळा विविध तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्या टप्पाची मुंबईकरांना अद्यापही प्रतीक्षा आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने कामांना वेग देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सध्या पहिल्या टप्प्याच्या विविध चाचण्या सुरू असून येत्या आठवड्याभरात रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…मिहीर कोटेच्या यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक, देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरडीएसओ प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करून जूनमध्ये मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणापत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही भिडे यांनी यावेळी सांगितले. एकूणच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार जुलैअखेर पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन असल्याची माहितीही भिडे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in mumbai metro 3 s aarey bkc route expected to start by end of july mumbai print news psg