मुंबई : अमर महल – सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्ग असा थेट सिग्नलमुक्त आणि अतिवेगवान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला – पानबाई इंटरनॅशनल स्कूल उन्नत रस्त्याचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले होते. पण एप्रिलचा मुहूर्त टळला असून आतापर्यंत या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच टक्के काम पूर्ण होण्यासाठी जुलै महिना उजाडणार आहे. त्यामुळे जुलैअखेरीस उन्नत रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरणातील कपाडिया नगर – वाकोला दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. ६०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यातील कपाडिया नगर – वाकोला नाला दरम्यान ३ किमी लांबीचा उन्नत रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र याच रस्त्यातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या २१० मीटर केबल स्टे पुलाचे आणि त्या पुढील ५०० किमी उन्नत रस्त्याचे अर्थात वाकोला नाला – पानबाई स्कूल उन्नत रस्त्याचे काम शिल्लक आहे. वाकोला नाला – पश्चिम द्रुतगती मार्गावरील सध्याच्या उड्डाणपुलावरून केबल स्टे पूल जाणार आहे. पुढे ही मार्गिका पानबाई स्कूलपर्यंत सध्याच्या उड्डाणपुलाला समांतर जाणार आहे. हा उन्नत रस्ता पूर्ण झाल्यास अमर महल – सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्गादरम्यानचे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे.

हेही वाचा…हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन!

विलंबामुळे कंत्राटदाराला दंड

सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरणाचे काम अत्यंत संथगतीने करण्यात आले. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होणे अपेक्षित होते. कंत्राटदाराच्या दिरंगाईची अखेर एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली. काही दिवसांपूर्वीच याच उन्नत रस्त्याच्या कामास विलंब केल्याप्रकरणी कंत्राटदार जे. कुमार कंपनीला अडीच कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in santacruz chembur expressway widening amar mahal santacruz elevated road completion pushed to july mumbai print news psg