‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने मुला-मुलींसाठी जिजामाता नगर येथील १,८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई मंडळाला फेब्रुवारीपासून आजतागायत वसतिगृह बांधण्याच्या कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही. वसतिगृहाची आवश्यक ती बांधकामपूर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र राज्यातील सत्तांतरामुळे आतापर्यंत प्रत्यक्ष वसतिगृहाची एक वीटही उभी राहू शकलेली नाही.
शिक्षण, तसेच नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींची निवासाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने मुंबई मंडळाने शहरात दोन वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी एक वसतिगृह जिजामाता नगर येथे उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिजामाता नगरमधील १,८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या कामाचे कार्यदिश जारी झाले असून बांधकामपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. वसतिगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला फेब्रुवारीमध्ये सुरुवात करण्यात येणार होती. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या आणि प्रकल्पाचे भूमीपूजन रखडले. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर कामास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवातीला त्यांच्या तारखा मिळत नसल्याने भूमिपूजन रखडले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर वसतिगृहाच्या बांधकामाचा विसर पडला.
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर खाते वाटप झाले नव्हते. परिणामी, वसतिगृहाच्या बांधकामाबाबत मुंबई मंडळाला ठोस निर्णय घेता येत नव्हता. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खाते सोपविण्यात आले आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या भूमीपूजनाबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे शक्य होणार आहे.
वसतिगृहाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात करण्याची तयारी झाली आहे. आता विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर गृहनिर्माण मंत्र्यांसमोर हा विषय मांडण्यात येईल. त्यानंतर भूमीपूजन करण्यात येईल, असे मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
जिजामाता नगरमधील १,८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर वसतिगृह
१८ मजली इमारत बांधणार
३७५ खोल्यांमध्ये ५०० जणांच्या राहण्याची सोय
१९ कोटी रुपये बांधकाम खर्च
खानावळ, बँक, व्यायामशाळा, वाहनतळ आदी सुविधा
बांधकामासाठी सी. बी. ॲण्ड सन्स कंपनीची नियुक्ती
वास्तुशास्त्रज्ञ म्हणून मेसर्स एस पी शेवडे ॲड असोसिएटची नियुक्ती