थंडीसोबतच दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी वाढत असून अखेर दिल्लीच्या हवेने प्रदूषणाच्या सर्व मर्यादा पार करून धोकादायक अवस्थेत प्रवेश केला. बुधवारी दिल्लीतील सर्वच भागांमधील प्रदूषण प्रमाणित पातळीपेक्षा पाचपटीने अधिक होते. यामुळे सर्वसामान्यांना श्वसनविकार होण्याची दाट शक्यता असल्याने त्यावर तातडीने उपाय करण्याची सूचना भूविज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ प्रकल्पाअंतर्गत दिला गेला. दिल्लीच्या या अनुभवावरून मुंबईनेही धडा घेण्याची गरज आहे. कारण, मुंबईतील चेंबूर, मालाड व अंधेरी या उपनगरातही प्रदूषणाची पातळी सामान्यपेक्षा तिपटीने अधिक नोंदली जात आहे.
वर्षांचे बाराही महिने प्रचंड वाहनसंख्या व वाहतूककोंडीमुळे कायमच धुरांडय़ात असलेल्या दिल्लीकरांना आता या समस्येची तीव्रता लक्षात येत आहे. सफर प्रकल्पाअंतर्गत दिल्लीमध्येही नऊ ठिकाणी प्रदूषणमापक यंत्र बसवण्यात आली असून त्यात धोकादायक वायूंची तसेच सूक्ष्म धुलिकणांची पातळी मोजण्यात येते. थंडीला सुरुवात झाल्यापासून दिल्लीतील प्रदूषणाची पातळीही वाढत होती. त्यात बुधवारी या पातळीने सर्वात वरची पातळी गाठली. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी (केसांचा व्यास ७०मायक्रोमीटर असतो) सूक्ष्म धूलिकणांचीच संख्या प्रचंड वाढली आहे. एका घनफूटात या सूक्ष्मकणांची संख्या १०० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असणे अपेक्षित असते. मात्र दिल्लीत ही संख्या ५०० मायक्रोग्रॅम प्रति घनफूटापेक्षा अधिक झाली होती. यासोबतच १० मायक्रोमीटरपर्यंतच्या सूक्ष्म धुलिकणांची संख्याही ३५० मायक्रोग्रॅमच्या पातळीवर पोहोचली होती. त्यामुळे बुधवारी रात्री दिल्लीत प्रदूषणाच्या अत्युच्च पातळीचा इशारा जारी करण्यात आला. ही हवा सर्वसामान्यांनासाठी घातक असून त्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात तसेच शरीरात कण जमा झाल्याने फुप्फुसाच्या विकाराचाही धोका वाढतो. त्यामुळे प्रदूषणाची पातळी तातडीने कमी करण्याची सूचना भूविज्ञान मंत्रालयाच्या सफर प्रकल्पाअंतर्गत दिल्या गेल्या. गुरुवारी विमानतळ परिसर वगळता इतरत्र प्रदूषणाची पातळी थोडी कमी झाली असली तरी पुढील तीन दिवसही प्रदूषणाची पातळी नियमित पातळीपेक्षा चारपट जास्त राहण्याचा अंदाज सफरकडून व्यक्त करण्यात आला.
मुंबईही दिल्लीपाठोपाठ
दरवेळी मुंबईचे प्रदूषण वाहून नेणारा समुद्रावरील वारा ऋतूबदलामुळे थंडावला असल्याने शहरातील प्रदूषणाची स्थितीही भयावह होत आहे. मालाड, चेंबूर व अंधेरी येथे सर्वसाधारण पातळीपेक्षा चारपट प्रदूषण वाढले आहे. बोरीवली येथील सूक्ष्म धुलिकणांची संख्याही अडीचपटीहून अधिक आहे. दिल्लीच्या राज्य सरकारने एक जानेवारीपासून सम-विषम क्रमांकाच्या वाहनांचा निर्णय लागू केला असला तरी महाराष्ट्रात मात्र अजूनही प्रदूषणाबाबत सरकारकडून कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत.