आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रीत्यर्थ नव्या महाराष्ट्र सदनात आयोजित दोन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात निवासी आयुक्तांच्या आडमुठेपणामुळे दिल्लीतील महाराष्ट्रवासीयांना एका चांगल्या कार्यक्रमाला मुकावे लागले. महाराष्ट्र सदनातील ध्वनियंत्रणेमध्ये वारंवार व्यत्यय येऊ लागल्यामुळे कार्यक्रमाचा आनंद लुटता आला नाही. बाहेरील ध्वनियंत्रणेला नकार देण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘महाराष्ट्र सदन’चे निवासी आयुक्त बिपिन मल्लिक यांनी बाहेरून यंत्रणा आणण्याची परवानगी दिल्याचे दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाचे प्रमुख हेगिज यांनी दूरध्वनीवरून सांगितले. परंतु शनिवारी तयारी करताना बाहेरील ध्वनियंत्रणा बसविण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या हेगिज यांनी मल्लिक यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. सभागृहात असलेल्या चार ध्वनिक्षेपकांच्या आधारेच त्यांना हा कार्यक्रम पार पाडावा लागला. त्यामुळे कार्यक्रमात बऱ्याच वेळा व्यत्यय आला आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा रसिकांना रसास्वाद घेता आला नाही.
सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरलेले देखणे ‘महाराष्ट्र सदन’ अलीकडे भरमसाठ दरवाढीमुळे चर्चेत आले होते. आता मात्र निवासी आयुक्तांच्या आडमुठेपणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. सभागृहातील ध्वनियंत्रणा ही फक्त भाषणासाठीच योग्य असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. गाण्यांचा वा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असल्यास त्यासाठी बाहेरील ध्वनियंत्रणा आवश्यक असते. इतर सगळ्या सभागृहात स्वत:ची ध्वनियंत्रणा असली तरी बाहेरील ध्वनियंत्रणेला परवानगी दिली जाते. परंतु मल्लिक यांच्या आडमुठेपणामुळे कार्यक्रमाची रंगत गेल्याचे मत हेगिज यांनी व्यक्त केले. याबाबत मल्लिक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क होऊ शकला नाही. मात्र लघुसंदेशाद्वारे विचारले असता, सदर सभागृहात ध्वनियंत्रणा असल्यामुळे बाहेरील यंत्रणेची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यशवंतरावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाने वीणा देव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमाचे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आयोजन केले होते. ३०० जणांची क्षमता असलेल्या सभागृहात असलेली ध्वनियंत्रणा ही गाण्यांच्या कार्यक्रमासाठी योग्य नसल्यामुळे बाहेरून ध्वनियंत्रणा आणण्याची परवानगी आयोजकांनी मागितली होती. मात्र ती आयत्यावेळी नाकारण्यात आली़

Story img Loader