प्रसाद रावकर

मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर सावध झालेल्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडे मागितले आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे, असा मजकूर असलेल्या प्रतिज्ञापत्रावर आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे.

शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या आमदारांनी विनवण्या केल्यानंतरही केलेली सुरत- गुवाहाटी- गोवा वारी, सरकार डळमळीत होण्याची चिन्हे निर्माण होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा दिलेला राजीनामा, भाजपशी हातमिळवणी करून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ या घडामोडींनंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपण शिवसेनेतच असल्याच्या बंडखोर आमदारांच्या दाव्याबाबत चित्र स्पष्ट झालेले नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत संशयाचा भुंगा गुणगुणू लागला आहे. बंडाचा झेंडा आणखी कोण कोण हाती घेणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या शाखा स्तरावरून पाठिंबा मिळण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता सावधगिरी म्हणून पक्षप्रमुखांबरोबर राहिलेले आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे. मुंबईमधील विभाग स्तरावरील आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तारीख आणि वेळेवर कार्यालयात येऊन प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायची आहे.

प्रतिज्ञापत्रातील मजकूर काय?

माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टय़े पूर्ण करण्यासाठी मी सदैव कायर्रत राहीन अशी ग्वाही देतो, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader