दिशा काते, लोकसत्ता

मुंबई : हवेची गुणवत्ता ढासळल्याचे वास्तव आरोग्य यंत्रणेला जाणवत नसले, तरी सजग नागरिकांनी त्यावर तातडीची उपाययोजना केली आहे. वांद्रे, कुर्ला, चेंबूर, नवी मुंबईसह अनेक भागांतील हवा अतिप्रदूषित असल्याची नोंद झाल्यामुळे तेथे हवा शुद्धीकरण यंत्रांची (एअर प्युरिफायर) मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.

कोंदट जागा, खेटून असलेल्या इमारती आणि दाट लोकसंख्येच्या भागांतील नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. अनुकूल तापमानासाठी वातानुकूलन यंत्रणा हा मुंबईतील जीवनशैलीचा अविभाज्य भाग होऊ लागला आहे. पण आता त्यात हवा शुद्धीकरण यंत्राचीही भर पडली आहे. हवा शुद्धिकरण यंत्रांच्या खरेदीकडे मुंबईकरांचा कल वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरातील हवेचा दर्जा वारंवार खालावत राहिला तर शुद्ध हवा मिळवणे ही अधिकाधिक खर्चाची बाब ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ श्वसनविकारांच्या रुग्णांसाठी हवा शुद्धिकरण यंत्रे खरेदी केली जात असत. परंतु करोनाची साथ वाढू लागल्यावर या यंत्रांची मागणीही वाढली. साथ ओसरू लागल्यावर ती कमी झाली. त्यावेळीही उच्चभ्रू समाजात ही मागणी अधिक होती. मात्र,गेल्या काही महिन्यांपासून हवा शुद्धिकरण यंत्रांची मागणी आणि चौकशी करणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मागणी कुठे?

हवा शुद्धिकरण यंत्र

हवेतील सूक्ष्म प्रदूषके (०.१ मायक्रॉनपर्यंत) नष्ट करून शुद्ध हवा देते, असा दावा केला जातो. अंधेरी, मालाड, वांद्रे, पवई, भांडूप, दादर, ठाणे, चेंबूर तसेच नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, पनवेल या शहरांमध्ये या यंत्राची मागणी अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

किमती काय?

देशी कंपन्यांसह आता बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही हवा शुद्धिकरण यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किमत सात हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत आहे. उत्पादनामध्ये डच कंपन्या आघाडीवर आहेत. अनेक भारतीय कंपन्यांची उत्पादनेही उपलब्ध आहेत. तुलनेने त्यांची किमत कमी असल्यामुळे त्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल आहे.

सध्या हवा शुद्धीकरण यंत्रांची मागणी  वाढत आहे. नव्या घरासाठी विद्युत उपकरणे खरेदी करताना हवा शुद्ध करणाऱ्या यंत्राची आवर्जून खरेदी केली जात आहे. अनेक कार्यालयेही ही यंत्रे खरेदी

करीत आहेत. – रमेश चौरासिया, विक्रेते