मलेरिया आणि डेंग्यु निर्मूलनासाठी हाती घेतलेली धूम्रफवारणी डिझेल व कीटकनाशकाच्या चोरीमुळे निष्प्रभ ठरत आहे. धूम्रफवारणी करणाऱ्यांवर कुणाचाच वचक नसल्याने त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पर्यवेक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविकेकडूनच करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या नगरसेविकेने आरोग्य समिती अध्यक्षांकडे तसे पत्रच सादर केले आहे.
मलेरिया नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये डास निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु अनेक वेळा धूम्रफवारणी योग्य पद्धतीने होत नाही. धूम्रफवारणी करणारे कर्मचारी डिझेल आणि कीटकनाशकाची चोरी करतात. त्यामुळे प्रभावीपणे धूम्रफवारणी होत नाही, असा आरोप नगरसेविका संजना मुणगेकर यांनी आरोग्य समिती अध्यक्ष गीता गवळी यंना पाठविलेल्या पत्रात केला आहे. धूम्रफवारणीसाठी किती डिझेल आणि कीटकनाशक आवश्यक आहे, कर्मचाऱ्यांना त्याचा किती साठा दिला जातो, त्यापैकी धूम्रफवारणीसाठी ते किती वापरतात, यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच काही वेळा कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे धूम्रफवारणी यंत्राला आग लागते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी  धूम्रफवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर पर्यवेक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी संजना मुणगेकर यांनी केली आहे. आरोग्य समितीची सोमवारी बैठक होत असून या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा