वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत चालल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच दवाखान्यांमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र पालिकेचे दवाखाने सांयकाळी बंद होत असल्यामुळे कामावरून घरी येणाऱ्यांना नाईलाजाने खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागते. त्यामुळे पालिकेचे दवाखाने रात्रीही सुरू ठेवावे अशी मागणी करणारा ठराव महापालिका सभागृहापुढे आला आहे.
गोरगरीबांनाच नव्हे तर मध्यमवर्गालाही आता खासगी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांकडून आकारण्यात येणारी फी परवडेनाशी झाली आहे. हे डॉक्टर अनेक चाचण्या करण्यास सांगून आपली फी तर घेतातच; वर नंतर रुग्णाला स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देऊन मोकळे होतात. ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना गेल्या काही वर्षांत संपुष्टात आल्यामुळे हा परिणाम झाला असून खासगी डॉक्टर व डायग्नोस्टिक सेंटर यांतील साटेलोटेही उघड गुपित आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेचे मुंबईतील १६८ दवाखाने रात्रीच्या वेळीही उघडे ठेवावे, अशी मागणी मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी पालिका सभागृहात ठराव सूचनेद्वारे केली आहे.

Story img Loader