शैलजा तिवले, लोकसत्ता 

मुंबई : मुंबईत जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्यावर घरीच करण्यात येणाऱ्या करोनाच्या स्वयंचाचण्यांच्या (सेल्फ टेस्ट) वापरातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या संचाची मागणीही वाढली आहे. शहरात किती संचाची विक्री होत आहे याची कोणतीही माहिती मात्र प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्यक्षात करोनाबाधितांची रुग्णसंख्या ही नोंदविल्या जाणाऱ्या दैनंदिन आकडेवारीपेक्षा जास्त असल्याची शक्यता आहे.

जून महिना सुरू होताच मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढून जवळपास दोन हजारांच्या घरात गेला आहे. परिणामी घरच्या घरी करता येणाऱ्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या चाचण्यांमधून २० मिनिटांत निदान होत असल्यामुळे गृहविलगीकरणासह अन्य निर्बंधापासून सुटका मिळविण्यासाठी त्यांची मागणी वाढली आहे. मे महिन्यात या संचाची विक्री शून्य होती; परंतु आता दिवसाला ३० ते ३५ संचांची विक्री होत आहे. यामध्ये बहुतांश जण हे बाहेरून प्रवास करून आल्याने किंवा प्रवासासाठी जाणार असल्याने चाचण्या करत आहेत.

मुंबईत मोठय़ा समारंभाला उपस्थिती लावल्यानंतर संसर्गाची बाधा झाली आहे का, या भीतीनेही चाचण्या करण्यासाठी संच खरेदी केले जात आहेत. नागरिक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करत असल्याने एका वेळी चार ते पाच संच घेऊन जात आहेत, असे दादरमधील फार्मा असोसिएशनचे अजय जोशी यांनी सांगितले.  जूनपासून मागणी सुरू झाली आहे. आमच्याकडे दर दिवशी दोन ते तीन संचांची विक्री होते. सर्दी, खोकला यांसारखी सौम्य लक्षणे असल्याने दक्षता म्हणून चाचणी करून घेण्यासाठी नागरिक संच घेऊन जात आहेत. काही जणांना कार्यालयातही चाचण्या करणे बंधनकारक केले आहे, असेही कर्मचारी संचाची मागणी करत असल्याचे अंधेरीच्या फार्मा असोसिएशनचे प्रेमल मेहता यांनी सांगितले.

घरगुती चाचण्या केलेल्या रुग्णांनी त्यांचे अहवाल भारतीय वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे अपेक्षित आहे; परंतु बहुतांश नागरिक या अहवालांची नोंद करत नसल्याने यांची दैनंदिन आकडेवारीमध्ये नोंद केली जात नाही. त्यामुळे मुंबईतील दैनंदिन आकडेवारीच्या तुलनेत प्रत्यक्षात रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

संचाच्या विक्रीची माहिती देण्याची पालिकेची मागणी

जून महिन्यापासून पुन्हा घरगुती संचाचा वापर वाढत असून या रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे पालिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. या चाचण्यांचा वापर किती केला जात आहे, संचाची विक्री कोणत्या भागांमध्ये जास्त होत आहे, याची माहिती देण्याची मागणी आम्ही अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले.

अद्याप कार्यवाही सुरू नाही

मुंबईत औषधेविक्रेते मोठय़ा प्रमाणात असून यांचा पाठपुरावा करणे शक्य नाही. पालिकेने मागणी केली असली तरी अशी माहिती संकलित करणे अवघड आहे. गेल्या वेळी ईमेल आयडी उपलब्ध करून माहिती देण्याचे आवाहन केले होते. या वेळी अजून प्रशासनाने माहिती देण्याबाबत किंवा संकलित करण्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त द.रा. गहाणे यांनी सांगितले.

आकडेवारीचे संकलन करणे शक्य

आमच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती आम्ही नियमितपणे पालिकेला अद्ययावत करतो. त्यामुळे संचाची विक्री किती झाली आहे, याची माहिती संकलित करणे सध्याच्या ऑनलाइनच्या काळात सहज शक्य आहे. तसेच या संचाची मुंबईत विक्री करणारे तीन ते चार वितरक आहेत. वितरकांमार्फतही थेट माहिती संकलित करणेही शक्य आहे, असे औषध विक्रेत्यांनी सांगितले.

Story img Loader