चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर भगवान परशुराम यांचे छायाचित्र छापल्यामुळे संभाजी ब्रिगेडने घेतलेली भूमिका ही जातीय तेढ निर्माण करणारी असून संमेलन उधळून लावण्याची धमकी देणाऱ्या संभाजी बिगड्रेविरु द्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू जनजगृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची समाधी तोड, दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा शोध लाव असले उद्योग करणाऱ्या संघटनांनी आता परशुरामांविषयी अपप्रचार करत जातीय तेढ निर्माण करण्याचे काम चालवले आहे. कोकणभूमी ही परशुरामांनी निर्माण केली आहे. तेथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे छायाचित्र छापले म्हणून संमेलन उधळण्याची भूमिका घेणाऱ्या संभाजी ब्रिगेडवर पोलिसांनी  गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे अशोक शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. भ्रष्टाचार, पाण्याची समस्या, शेतकऱ्यांच्या जमिनींची लुबाडणूक आदी अनेक विषय असताना पुण्यात भांडरकर संस्थेवर हल्ला कर, दादोजी कोंडदेवांना विरोध कर असले समाजविघातक उद्योग करण्याचे काम संभाजी ब्रिगेड करत आहे. त्यामुळे संमेलन शांततेत पार पडेल याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे आवाहनही हिंदू जनजागृती समितीने केले आहे.

Story img Loader