करोनाच्या साथीमध्ये निर्बंधांमुळे दिवाळी फराळाच्या परदेशवारीत घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आपल्या परदेशस्थित आप्तांना फराळ पाठवण्यासाठी गर्दी होत असून यंदा ६० टक्क्यांनी फराळ पाठवणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे मत व्यावसायिकांनी नोंदवले. मात्र, त्याचवेळी डॉलर्सची वाढलेली किंमत, हवाई वाहतुकीचे वाढलेले दर यांमुळे यंदा परदेशी फराळ पाठवण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे.

हेही वाचा- मुंबई: दादर आणि गिरगाव चौपाटीनंतर आता नरिमन पॉईंट येथेही दर्शक गॅलरी

पूर्णपणे निर्बंधमुक्त दिवाळी नातेवाईक, आप्तांच्या भेटी-गाठी घेऊन साजरी करण्यात येत आहे. त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना फराळ पाठवून त्यांनाही या आनंदात सहभागी करायचा प्रयत्न आवर्जून करण्यात येतो. जवळपास दोन आठवड्यांपासून परदेशी फराळ पाठवण्यासाठी कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयात गर्दी झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेतच नाही तर करोना साथीच्या पूर्वी मिळणाऱ्या प्रतिसादाच्या तुलनेत यंदा अधिक प्रतिसाद असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले आहे. साधारण ४० ते ६० टक्क्यांनी प्रतिसाद वाढला असल्याचे मत नामांकित आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपन्यांच्या शाखेतील व्यवस्थापकांनी व्यक्त केले. दोन किलो ते पाच किलो पर्यंतच्या टपालावर ४० टक्के तर पाच किलो पेक्षा अधिक वजनाच्या टपालावर ५०% अशा सवलतीही व्यावसायिक देत आहेत. यंदा दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत अगदी चारशे रुपये किलो या दराने फराळ पाठवता येत होता. काही नामांकित कंपन्यांचा दर आता पाचशे ते साडेपाचशे रुपयांदरम्यान आहे.

हेही वाचा- पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पटीने वाढ, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्णय!

कमी स्निग्धांशाच्या फराळाला मागणी

कुरिअर कंपन्याप्रमाणे फराळ बनवणाऱ्या दुकानांमध्ये रोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. यातील बराचसा ग्राहकवर्ग हा परदेशी फराळ पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. फक्त दुकानात नाही तर घरगुती फराळ तयार करणाऱ्यांकडे यंदा कमी स्निग्धांश(लो-फॅट) आणि साखर विरहित (शुगर फ्री) फराळासाठी अधिक मागणी आहे.

हेही वाचा- शिंदे, राज यांच्याबरोबरच्या दिपोत्सवानंतर फडणवीसांचं BMC निवडणुकीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पुढच्या वर्षी दिवाळीचा…”

‘आम्ही दरवर्षी आमच्या ग्राहकांसाठी फराळ तयार करतो. कोरोना काळात आमचा घरगुती फराळाचा व्यवसाय कमी झाला होता पण यावर्षी अनेक ग्राहक अगदी लांबून आमच्याकडे फराळ घेण्यासाठी येत आहेत. त्यात बहुतेक ग्राहक परदेशात फराळ पाठवायचा म्हणून आरोग्यासाठी योग्य अशा फराळाची मागणी करत आहेत. आमच्याकडे गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी जास्त मागणी आहे, असे एका घरगुती फराळ तयार करणाऱ्या उद्योजिकेने सांगितले.