मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेनेसह (ठाकरे) डाव्या पक्षांनी शनिवारी कोकाटेंविरोधात आघाडी उघडली.
‘कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्नांमध्ये उधळपट्टी करतात’ अशा आशयाचे कोकाटे यांचे विधान चर्चेत आहे. यावरून शनिवारी महाविकास आघाडीने त्यांना लक्ष्य करत मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. ‘‘बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचा अपमान करण्याची एकही संधी महायुती सरकार सोडत नाही. कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत,’’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत, अशी टीका शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली. कृषिमंत्री किती असंवेदनशील आहेत, हेच सिद्ध होते, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली. काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. अशा उथळ मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे सरकार म्हणते. त्यात कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. – हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस</p>
कोकाटे नेमके काय म्हणाले?
●अजित पवारांच्या कर्जमाफीबाबत विधानाचा संदर्भ देत नाशिकमध्ये एका शेतकऱ्याने कर्जमाफी मिळेल का, असा प्रश्न कोकाटे यांना विचारला.
●त्यावर कृषीमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचे दिसले. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता?
●शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? पीक विम्याचे पैसे पाहिजे… मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा’ असे ते म्हणाले होते.