मुंबई : दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंद आणि चैतन्याचे वातावरण आहे. मात्र खासगी कार्यलयांना सुट्टी नसल्यामुळे बहुतांश महिलांनी घरी फराळ करण्याऐवजी तयार फराळ घेण्यास पसंती दर्शवली आहे. यामुळे गृहउद्योगांना चालना मिळत असून यावर्षी तयार फराळाच्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पूर्वी दिवाळी जवळ आल्यानंतर आठ-दहा दिवस आधी घरोघरी फराळ तयार करण्याची लगबग सुरू व्हायची. मात्र, वाढते शहरीकरण, धकाधकीचे दैनंदिन जीवन, महागाई आणि विभक्त कुटुंब पद्धती आदी विविध कारणांमुळे महिलांना घरी फराळ तयार करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे हळूहळू तयार फराळ विकत घेण्याकडे महिलांचा कल वाढू लागत आहे. परिणामी, यंदा महिला बचत गट आणि गृहउद्योगांकडे फराळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याच वेळी महागाईमुळे फराळांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

हेही वाचा…तांदळाचे विक्रमी उत्पादन, निर्यात होणार ? जाणून घ्या, देशासह जागतिक तांदूळ उत्पादनाची स्थिती

फराळाच्या जिन्नसातील करंजी आणि चकलीची प्रतिकिलो ५०० रुपये, तर शंकरपाळ्या, रवा लाडू आणि बेसनचा लाडू प्रतिकिलो ४५० रुपये दर आहे. अनारसे प्रतिकिलो ६०० रुपयांना उपलब्ध आहेत. तसेच, दुकानांमध्ये, तसेच फराळाचे जिन्नस तयार करणाऱ्यांकडे साखर विरहित (शुगर फी) फराळासाठी अधिक मागणी आहे. या फराळांच्या किंमती सामन्य फराळांपेक्षा १०० ते १५० रुपयांनी अधिक आहेत.

हेही वाचा…मुंबई विमानतळावर पुन्हा ‘पॉफेक्ट’ उपक्रम

दरवर्षी ग्राहकांसाठी फराळ तयार करतो. करोना काळात घरगुती फराळाच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असून यावर्षी सर्वाधिक फराळाला मोठी मागणी आहे. परदेशातही फराळ पाठविण्यात आला. विशेष म्हणजे परदेशातून साखर विरहित फराळाला अधिक मागणी होती, असे फराळ तयार करणाऱ्या उद्योजिका लीना भागवत यांनी सांगितले.