मुंबई : कोल्ड प्ले या जगभरात नावाजलेल्या बँडच्या जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या आरोपाच्या निमित्ताने उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका करण्यात आली. तसेच, तिकिटांच्या अशाप्रकारच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित व्यास यांनी ही जनहित याचिका केली असून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर त्यांची ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी सोमवारी सादर करण्यात आली. त्यावेळी, बनावट आणि अवैध संकेतस्थळावरून अद्यापही या कार्यक्रमाच्या तिकिटांची चढ्या किंमतीने विक्री सुरू असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. न्यायालयाने मात्र त्यास नकार दिला. त्याचप्रमाणे, या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू असल्याचे नमूद करून याचिकेवर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी ठेवली.

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणातल्या चार आरोपींना २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, मैफिली, लाइव्ह शो यांसारख्या प्रमुख कार्यक्रमांच्या ऑनलाईन तिकिटांच्या विक्रीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात कोल्डप्ले या कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शो या ऑनलाईन तिकीट विक्री व्यासपीठावरून उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर काही मिनिटांत सर्व तिकीटे विकली गेली. या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल तीन लाखांपर्यंतची रक्कम मोजल्याचेही उघड झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑनलाईन तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावाही याचिकाकर्त्याने याचिकेद्वारे केला आहे.

हेही वाचा : मुंबई: कोपरीत परवानगीपेक्षा जास्त फटाक्यांची साठवणूक आणि बेकायदा विक्री ? दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

आयपीएल क्रिकेट सामन्यांसह २०२३ मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांची तसेच गायक टेलर स्विफ्ट आणि दिलजीत दोसांझ यांच्या संगीत कार्यक्रमांच्या तिकिटांची अवैध मार्गाने विक्री झाल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. अशा कार्यक्रमांदरम्यान आयोजक आणि तिकीट विक्री भागीदार दुय्यम तिकीट संकेतस्थळावरून चढ्या दराने तिकिटांची विक्री करून चाहत्यांचे शोषण करत असल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. याप्रकरणी आपण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलीस तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी सुरू आहे, असेही व्यास यांनी याचिकेत म्हटले आहे. अशा बेकायदेशीर प्रथांमुळे नागरिकांना सार्वजनिक करमणुकीची समान संधी मिळण्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. किंबहुना, तिकीट विक्री क्षेत्रातील ठोस नियमांच्या अनुपस्थितीत, बुकमाय शोसारख्या कंपन्या नियमांचे उल्लंघन करत आहेत, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand in high court to stop cold play online tickets sold in black through public interest litigation mumbai print news css