* हापूस आंब्याची आवक वाढली
* घाऊक बाजारात ३५० पेटय़ा दाखल
कोकणात यावर्षी लवकर पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे ऑक्टोबर महिन्यात हापूस आंब्याने घेतलेली फळधारणा बागायतदारांच्या पथ्यावर पडू लागली असून बऱ्यापैकी तयार झालेला हापूस आंबा आता मुंबईत पाठविण्याची बागायतदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या दशकात कधी नव्हे एवढा हापूस आंबा जानेवारी महिन्यातच डेरेदाखल होत असून सोमवारी ३५० पेटय़ा हापूस नवी मुंबईतील एपीएमसीच्या घाऊक फळबाजारात आला.
या कच्चा हापूस आंब्याचा दर अडीच हजार ते पाच हजार रुपये पेटी असा आहे. इतक्या लवकर आंबा बाजारात पाठविल्यानंतर मार्चमध्ये इतर बागायतदारांना दर कमी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोकणातील बागायतदारानो, जरा सबुरीने घ्या, असा सल्ला या व्यवसायातील जूने-जाणते व्यापारी देत आहेत.
कोकणात यावर्षी विक्रमी हापूस आंब्याचे उत्पादन होणार असे दिसून येते. गतवर्षीचे कमी उत्पादन आणि यावर्षीची हापूस आंब्याच्या फळधारणेला मानवणारी थंडी यामुळे हापूस आंबा मुबलक येणार असा जाणकरांचा अंदाज आहे. त्यामुळे हुशार बागायतदारांनी आतापासून आंबा मुंबईच्या बाजारात पाठविण्याची स्पर्धा सुरू केली आहे. एका बागायतदाराने चार पेटय़ा काढल्या कि शेजारचा मागचा पुढचा विचार न करता आठ पेटय़ा उतरवित आहे. त्यामुळे मुंबईत हापूस आंबा येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आंब्याला भावही चांगला मिळत आहे. मार्च नंतर १०० पेटय़ा विकून मिळणारा नफा आत्ताच ५० पेटय़ा विकून मिळत असेल तर तो कोणाला नको, असा विचार बागायतदार करत असल्याचे एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात येणारा माल हा देवगडच्या कुणकेश्वर, वाळकेवाडी येथील अधिक प्रमाणात आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या हापूस आंब्याला सात ते नऊ हजार रुपये पेटी असा भाव मिळाला होता. आज तो भाव अडीच ते पाच हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. बागायतदारांनी अधिक घाई केल्यास हा भाव आणखी खाली येण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.
फेब्रुवारीत हापूस आंब्याची आवक जास्त प्रमाणात होण्याची शक्यता संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली. कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन चांगले आल्याने मे महिन्याच्या अखेर सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत हा फळांचा राजा घरात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोकणचा राजा बाई दंगा मांडतो..
कोकणात यावर्षी लवकर पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे ऑक्टोबर महिन्यात हापूस आंब्याने घेतलेली फळधारणा बागायतदारांच्या पथ्यावर पडू लागली असून बऱ्यापैकी तयार झालेला हापूस आंबा आता मुंबईत पाठविण्याची बागायतदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या दशकात कधी नव्हे एवढा हापूस आंबा जानेवारी महिन्यातच डेरेदाखल होत असून सोमवारी ३५० पेटय़ा हापूस नवी मुंबईतील एपीएमसीच्या घाऊक फळबाजारात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 29-01-2013 at 02:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand increase for mango