मुंबई : दिवाळी जवळ येऊ लागली असून मुंबई महानगरपालिकेमध्ये सानुग्रह अनुदान अर्थात बोनसचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने बोनसच्या मागणीसाठी मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दिवाळीला आता जेमतेम एक महिना उरला असून पालिकेच्या लाखभर कर्मचाऱ्यांचे लक्ष दिवाळी बोनसकडे लागले आहे. कर्मचाऱ्यांना खूष करण्यासाठी कामगार संघटनाही कामाला लागल्या आहेत. कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त बोनस मिळावा म्हणून कामगार संघटना कामाला लागल्या आहेत. समन्वय समितीच्या सदस्यांनी मंगळवारी इक्बल सिंह चहल यांना निवेदन देऊन बोनसची मागणी केली. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, दिवाकर दळवी, वामन कविस्कर, अशोक जाधव, संजीवन पवार, शे. मो. राठोड, के. आर. सिंह उपस्थित होते.
हेही वाचा – जलविद्युत प्रकल्पांसाठी नवे धोरण; खासगी सहभागाला प्रोत्साहन; मंत्रिमंडळाचा निर्णय
महापालिकेतील कामगार, कार्यालयीन कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, परिचारिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलातील जवान या कायम कर्मचाऱ्यांबरोबरच विविध खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बोनस द्यावा, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. तसेच बोनसच्या रकमेतून आयकर व अन्य कर परस्पर कापून घेतले जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्ण बोनस मिळत नाही. परिणामी, बोनसच्या रकमेतून आयकर कापू नये किंवा अनिवार्य असल्यास पुढील पगारातून कापून घ्यावा, अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे.
हेही वाचा – मुंबई : महागड्या मोटरगाड्या फोडून चोरी करणाऱ्यास अटक, तीन गुन्हे उघड
पालिकेचे सुमारे लाखभर कर्मचारी असून गेल्यावर्षी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर २०० कोटी रुपयांहून अधिकचा भार आला होता.