स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणीच मुळात चुकीची होती. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेतले नाही आणि तशा स्वरूपाची मागणी केली. त्यामुळे जोशींसह पक्ष नेतृत्वही अडचणीत आले, असे मत रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केले. कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, लातूर, सातारा, पुणे, रामटेक, वर्धा या लोकसभा मतदार संघापैकी तीन आणि राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी मागणी महायुतीकडे केली आहे. तसेच २०१४ च्या निवडणूकीत महायुतीसोबतच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे येथील सेंट्रल मैदानात रिपाइंच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून त्याविषयी माहिती देण्यासाठी रामदास आठवले यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या जागेत व्हावे, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. पण तो मागे पडला. बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली होती. पण, मनोहर जोशी यांनी भावनेच्या भरात त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी केली. त्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली नाही, त्यामुळे स्मारकाच्या मुद्दय़ावरून जोशींसह उद्धव ठाकरेही अडचणीत आले, असे आठवले यांनी सांगितले. मनोहर जोशी यांना पक्षात सन्मान होता. बाळासाहेबांनीही त्यांना भरभरून दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शंका घेणारी त्यांची भूमिका योग्य नव्हतीच, असेही ते म्हणाले. जोशी यांनी आता कोणत्याही पक्षात जाऊ नये, उद्धव ठाकरेही त्यांना माफ करतील, त्यांनी आता शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बजवावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि उद्योगमंत्री नारायण राणे हे मनोहर जोशींमुळे दुरावले असतील तर त्यांनी आता परत यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होऊन दोन किंवा तीन जिल्हे झाले पाहिजे. या जिल्ह्य़ांचे मुख्यालय कुठे करावे, यासाठी आमची कोणतीही मागणी नाही. पण, त्यापेक्षा जास्त म्हणजे चार जिल्हे करण्यास आमचा विरोध राहील, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा