मुंबईः ग्रँट रोड येथील तरूण व त्याच्या मैत्रिणीच्या नावाने इन्स्टाग्राम प्रोफाईल तयार करून त्यावर खासगी छायाचित्र अपलोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपीने इन्स्टाग्राम खाते बंद करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीच मागणी केली होती. त्यातील दीड लाख रुपये तक्रारदाराने आरोपीला दिले होते. उर्वरीत रक्कम दिली नाही म्हणून आरोपीने त्याला संदेश पाठवून धमकी दिली आहे. याप्रकरणी डॉ. दादासाहेब भडकमकर(डीबी) मार्ग पोलिसांनी आरोपीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार ३५ वर्षांचा असून ग्रँट रोड येथील रहिवासी आहे. एका अनोळखी व्यक्तीने १४ फेब्रुवारीला तक्रारदार व त्यांच्या मैत्रीणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडले होते. त्यावर खासगी व आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे तक्रादाराची बदनामी होत होती. याप्रकरणी जितेंद्र दिलीपसिंह राजपुरोहित याने तक्रारदाराकडे संबंधीत इन्स्टाग्राम खाते बंद करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तक्रारदाराकडे एवढी रक्कम नसल्यामुळे त्याने सुरूवातीला रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर बदनामीच्या भीतीने दीड लाख रुपये आरोपीला दिले. पण आरोपीने उर्वरीत रकमेसाठी तक्रारादराकडे तगादा लावला. पण त्यानंतरही तक्रारदाराकडून उर्वरीत रक्कम न आल्यामुळे अखेर आरोपी जितेंद्रने तक्रारदाराला धमकीचा संदेश पाठवला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी तक्रारीनंतर डीबी मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३१९(२), ३५१ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६(क) व ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.