लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : डॉक्टरचे खासगी चित्रफित वायरल करण्याची धमकी देऊन पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी ४३ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी खंडणी, मारहाण, धमकावणे, चोरी असे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

२६ वर्षीय डॉक्टरच्या दवाखान्यात आरोपी राजा वेणू नायकर ऊर्फ केडी राजा ६ मार्चला आला होता. त्यावेळी त्याने डॉक्टरांना मोबाइलमधील त्यांचे खासगी छायाचित्र दाखवले. तसेच चित्रफीत वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने त्यांच्याकडे ६० हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यांना धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरने आपल्याकडे सध्या पैसे नसल्याचे सांगितले आणि आरोपीला दीड हजार रुपये जीपेद्वारे पाठवले. त्यावेळी दवाखान्यातून बाहेर पडताना आरोपीने त्याला पुन्हा धमकावले. तसेच पैसे लवकर देण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनंतर आरोपी पुन्हा डॉक्टरच्या दवाखान्यात आला.

त्याने चित्रफित वायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी दवाखान्यात जाण्यापासून आरोपीने डॉक्टरांना रोखले व त्याला धक्काबुक्की केली. तसेच दवाखान्यात आलेल्या रुग्णांना त्याने धमकावून तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे घाबरून अनेक रुग्ण पळून गेले. आरोपीने शेजारची दुकानेही बंद केली. तसेच त्यांचे सर्व व्यवहार बंद करण्याची धमकी दिली. अखेर डॉक्टरने याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून आरोपी राजाला अटक केली. आरोपी व्यवसायाने मॅकॅनिक आहे.

१५ गुन्हे, २४ प्रतिबंधात्क कारवाया

आरोपी राजा हा शीव परिसरातील रहिवासी असून त्याच्याविरोधात मारहाण, धमकावणे, खंडणी, जबरी चोरी असे १५ गुन्हे दाखल आहेत. तसेच यापूर्वी २४ वेळा त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टरला धमकावून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपी करीत होता. आरोपीने प्रथम तक्रारदाराकडे ६० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर दुसऱ्या वेळी पाच लाख रुपये देण्यासाठी धमकावले. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

खासगी चित्रफितची तपासणी

डॉक्टरचा खासगी चित्रफित आरोपीने कशी मिळवली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. आरोपीच्या मोबाइलमध्ये ती चित्रफीत होती. त्यामुळे आरोपीचा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आरोपीला राहत्या परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिासंनी दिली.