मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक तसेच राज्य शासन व पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक आणि अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील (एम्स) डॉक्टरांची निवृत्तीची वयोमर्यादा ६४ ते ६७ वर्षे इतकी असतानाही परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय हे ६० वर्षे आहे. ही निवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी टाटा कॅन्सर रुग्णालयातील आजी-माजी डॉक्टरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयात कर्करुग्णांचा ओघ वाढत असताना आगामी वर्षात येथील आठ डॉक्टर निवृत्त होणार असल्याने रुग्णांच्या उपचारात अडचण निर्माण होण्याची भीती काही ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
टाटा कॅन्सर रुग्णालय ही स्वायत्त संस्था असून केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी विभागाच्या अखत्यारित येते. फेब्रुवारी १९४१ मध्ये मुंबईतील परळ येथे स्थापन झालेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाचा मागील काही वर्षात विस्तार झाला असून खारघर व हाफकिन संस्थेत नव्याने मोठ्या प्रमाणात बेड उभारण्यात येत आहेत. परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात एकूण ७४० खाटा असून वर्षाकाठी ७८ हजार नवीन रुग्ण उपचारासाठी येत असतात तर जुने व नवीन रुग्ण मिळून पावणेदोन लाख रुग्णांवर वर्षाकाठी उपचार करण्यात येत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या टाटा कॅन्सर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचारी मिळून सुमारे तीन हजार लोक काम करत असून या सर्वांची निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे एवढी आहे. येथील प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टरांमुळे रुग्णांची मोठी सेवा होत असून खारघर येथे पुढील वर्षापर्यंत ९०० खाटांची रुग्णोपचारासाठी भर पडणार आहे तर हाफकिन संस्थेत आगामी चार वर्षात ४०० नवीन खाटांचे सुसज्ज विस्तारित रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. या रुग्णालयात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे असल्याचा मोठा फटका आम्हाला बसत असल्याचे यथील डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा : मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधानांनीच घ्यावा; आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी चेंडू पंतप्रधान मोदींकडे टोलावला
वैद्यकीय त्यातही कर्करोग विशेषज्ज्ञ बनण्यासाठी साधारणपणे ३२ ते ३४ वर्षांपर्यंत अभ्यास करावा लागतो. त्यानंतर टाटा कर्क रुग्णालयातील सेवाकाळ हा ६०व्या वर्षी संपुष्टात येतो. आमची कार्यक्षमता व अनुभव यांचा विचार करता केंद्र शासन व राज्य शासनाच्या तसेच एम्स संस्थेतील निवृत्तीच्या वयोमर्यादेप्रमाणेच आमचेही निवृत्तीचे वय वाढविण्यात यावे, ही आमची रास्त अपेक्षा असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यापूर्वी टाटा कॅन्सर रुग्णालयातील विभागप्रमुखांना निवृत्तीनंतर दोन वर्षे तर संचालकांना पाच वर्षे मुदतवाढ मिळत होती. तथापि ॲटॉमिक एनर्जी विभागाने नव्याने लागू केलेल्या नियमानुसार निवृत्त होणाऱ्यांपैकी केवळ २५ टक्के लोकांनाच मुदतवाढ देण्याचा नियम तयार केला आहे. नेमके याच वर्षी टाटा कॅन्सर रुग्णालयामधून आठ प्रतिथयश तज्ज्ञ डॉक्टर निवृत्त होणार आहेत. यापैकी केवळ दोनच जणांना नव्या नियमानुसार मुदतवाढ मिळू शकते. याचा फटका केवळ निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांनाच बसणार नाही तर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही बसणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा वाढता ओघ व सध्या असलेली व्यवस्था त्याला पुरेशी ठरत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. अशावेळी आहे त्या डॉक्टरांचे निवृत्ती वयोमर्यादा वाढविल्यास रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
हेही वाचा : ठाण्यात उपक्रमांसाठी शासकीय जमीन; पक्षीगृह, रामकृष्ण मिशनला जागा
देशातील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सर्व रुग्णालयात वैद्यकीय अध्यापकांचे निवृत्ती वय ६५ वर्षे आहे. एम्समध्ये मध्ये ६७, भारतातील वेगवेगळ्या राज्यात वैद्यकीय अध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे तर मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६४ वर्षे आहे.
कर्करोगाचे निदान व उपचार हे अतिशय विशेष व गुंतागुंतीचे असतात. यात प्रावीण्य मिळवायला अनेक वर्षांचा अभ्यास असतो. या आजाराच्या निदानात विशेष कौशल्य प्राप्त केलेल्या तज्ज्ञ डॉक्टर विभागप्रमुखांना नव्या नियमाचा फटका बसून निवृत्त व्हावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विभाग प्रमुखांना व इतर ज्येष्ठ डॉक्टरांना निदान मुंबई मुंबई महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांप्रमाणे किमान ६४ वर्षे पर्यंत सेवा करता यावी अशी मागणी टाटा रुग्णालयातील काही आजी-माजी डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा : राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक; कोकण, मराठवाडा, विदर्भात २० हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य |
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशभरातील कर्करुग्णांच्या उपचारात एकसमानता यावी, यासाठी देशभरात टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या माध्यमातून सुमारे ३०० कॅन्सर ग्रीड केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. आसामपासून देशाच्या वेगवेगळ्या भागात ही कर्करोग उपचार केंद्रे असून येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून येथे उपचार केले जातात. या डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी ज्येष्ठ डॉक्टर नसतील तर आगामी काळात ही व्यवस्था कशी चालेल असा प्रश्नही काही डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असून खासदारांनीही या प्रश्नात लक्ष घालावे अशी अपेक्षा टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.